नवी दिल्ली - जागतिक राजकारणातील वाढता तणाव व अमेरिकेच्या आक्रमक व्यापार धोरणांमुळे सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मंगळवारी सर्वसामान्य नागरिकांचे डोळे दिपतील अशी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७,३०० म्हणजेच ४.६ टक्के वाढ होत ते १,६६,००० रुपयांवर तर चांदीच्या दरात तब्बल ४०,५०० म्हणजेच १२.३ टक्के वाढ होऊन ती ३,७०,००० रुपये प्रति किलो या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली. चांदीच्या किमतीतील वाढ ही आजवरच्या सर्वात मोठ्या वाढीपैकी एक आहे. ही तेजी अजून काही काळ टिकून राहण्याची शक्यता आहे.
ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली चांदी
- १ जानेवारी: २,२९,२५०
- २७ जानेवारी: ३,७०,०००
सोन्याची किंमत अशी वाढली
- २०२४: ७०,०००
- २०२५: ८०,०००
- २०२६: १,६६,०००
का वाढले भाव?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि दक्षिण कोरियावर लादलेल्या नव्या व्यापार शुल्कामुळे (टॅरिफ) जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.
सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील गुंतवणूकदार आता सोन्या-चांदीकडे वळत आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीनंतर मंगळवारी बाजार उघडताच खरेदीसाठी झुंबड उडाली, ज्याचा परिणाम किमतींवर दिसून आला.
२७ दिवसांत चांदीच्या भावात ६१.४% वाढ
चांदीची किंमत १ जानेवारी २०२६ रोजी २,२९,२५० इतकी होती. केवळ २७ दिवसांत चांदीच्या किमतीत ६१.४ टक्के म्हणजेच १,४०,७५० रुपये प्रति किलो इतकी वाढ झाली. या २७ दिवसांत चांदीचे दर सरासरी ५,२०० रुपये प्रति दिवस या वेगाने वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीने प्रथमच १०० डॉलर्स प्रति औँसचा टप्पा ओलांडला आहे.
