Silver Price Hike: चांदीची सध्या असलेली तेजी ही काही अफवा नाही, ती आकड्यांवर, मागणीवर आणि जागतिक बदलांवर आधारित आहे. जग हरित ऊर्जेकडे जात असताना, चांदी ही त्या प्रवासातील मूक पण महत्त्वाची साथीदार ठरत आहे. म्हणूनच चांदीची किंमत का वाढतेय? कारण तिची गरज वाढतेय... आणि ती सहज मिळत नाहीये.
चांदी ही केवळ दागिन्यांची किंवा नाण्यांपुरती राहिलेली नाही. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत चांदी ही ऊर्जा संक्रमण, इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान आणि हरित क्रांतीची अत्यावश्यक कच्ची सामग्री बनली आहे. याच पार्श्वभूमीवर चांदीच्या किमती सातत्यानं वर चढताना दिसत आहेत. चांदीच्या खाणींतून उत्पादन मर्यादित, खर्चिक आणि वेळखाऊ ठरत आहे. त्यामुळे मागणी झपाट्यानं वाढतेय, पण पुरवठा तितक्याच वेगानं येत नाहीये. याच तफावतीतून चांदीची चमक वाढतेय. म्हणूनच आजचा प्रश्न केवळ "भाव वाढला का?' एवढाच नाही, तर 'हा ट्रेंड किती काळ टिकेल?' हा अधिक महत्त्वाचा ठरतो.
तुमच्या मनातील प्रश्न आणि त्याची उत्तरं
मग चांदीच्या किमती नेमक्या कोणत्या कारणांमुळे वाढत आहेत?
उत्तर : मागणी-पुरवठ्यात सलग पाच वर्षाची तूट आहे. सौरऊर्जा व हरित संक्रमण, इलेक्ट्रॉनिक्स-एआय-ईव्ही बूम, मर्यादित खनिज उत्पादन, महागाई व चलन अस्थिरता (सुरक्षित पर्यायी गुंतवणूक) यामुळे चांदीच्या किमती वाढत आहेत.
पुढील काळात चांदीच्या किमती वाढतील का?
उत्तर : सध्याचे आकडे आणि ट्रेंड पाहता मध्यम ते दीर्घ काळात चांदीवर तेजीचा दबाव कायम राहण्याची शक्यता जास्त आहे. मागणी-पुरवठ्यातील दरी लवकर भरून निघेल, असे कोणतेही संकेत नाहीत. सौर आणि इलेक्ट्रॉनिक्सचा वेग कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे किंमतींमध्ये चढउतार असले तरी एकूण दिशा वरचीच राहू शकते.
मग चांदीत गुंतवणूक करावी का?
उत्तर : होय, पण अभ्यास करून आणि संतुलन राखूनच.
चांदीत गुंतवणूक कधी योग्य ?
उत्तर : १. दीर्घकालीन दृष्टीकोन असेल तर. २. पोर्टफोलिओमध्ये विविधता हवी असेल तर. ३. सोन्याबरोबर एक पर्याय म्हणून
गुंतवणूक कशी करावी?
उत्तर : १. एसआयएलव्हर ईटीएफ, २. डिजिटल चांदी. ३. भौतिक चांदी (मर्यादित प्रमाणात) टीप: चांदी अधिक अस्थिर असते, त्यामुळे संपूर्ण गुंतवणूक त्यात नको.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
