SBI ATM Charges: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) एटीएम व्यवहाराच्या नियमांमध्ये बदल केला आहे. एसबीआयनं आपल्या एटीएम ट्रान्झॅक्शन चार्जेस आणि फ्री युज लिमिटमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. चला जाणून घेऊया बँकेनं काय केलेत बदल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल?
मोफत व्यवहारांची मर्यादा किती?
स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) मोफत एटीएम व्यवहारांच्या संख्येत बदल केला आहे. या बदलानुसार, सर्व ग्राहक, मग ते मेट्रो किंवा नॉन-मेट्रोमध्ये राहत असतील, त्यांना एसबीआय एटीएममध्ये दरमहा १० विनामूल्य व्यवहार आणि इतर बँकेच्या एटीएममध्ये ५ विनामूल्य व्यवहार मिळतील. खात्यात सरासरी २५ ते ५० हजार रुपये मासिक शिल्लक असलेल्या ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएममध्ये ५ मोफत व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे. ५०,००० ते १,००,००० रुपयांपर्यंत शिल्लक असलेल्यांना हीच अट लागू आहे. सरासरी मासिक शिल्लक (एएमबी) १,००,००० रुपयांपेक्षा जास्त असलेल्या खातेदारांना एसबीआय आणि इतर बँकांच्या एटीएममध्ये अमर्यादित विनामूल्य व्यवहारांचा आनंद घेता येईल. म्हणजेच त्यांच्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा राहणार नाही.
किती कमी होऊ शकतो तुमचा EMI? होम लोन घेणाऱ्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठं गिफ्ट, रेपो दरात कपात
एटीएम सेवा शुल्कात बदल
स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) एटीएमवरील शुल्कातही बदल केला आहे. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, एकदा तुम्ही तुमची मोफत एटीएम ट्रान्झॅक्शन लिमिट संपवल्यानंतर एसबीआय तुम्हाला एसबीआय एटीएममधील प्रत्येक व्यवहारावर १५ रुपये + जीएसटी आकारेल, मग तुम्ही कुठेही असाल. जर तुम्ही इतर बँकांचे एटीएम वापरत असाल तर हे शुल्क २१ रुपये + जीएसटी असेल. बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट आदी सेवांसाठी फ्री लिमिटनंतर एसबीआयच्या एटीएममध्ये कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. मात्र, जर तुम्ही इतर बँकांचे एटीएम वापरत असाल तर तुमच्याकडून प्रत्येक व्यवहारासाठी १० रुपये + जीएसटी आकारले जातील.
जर तुमच्या बचत खात्यात पैसे नसल्यामुळे एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झालं तर तुम्हाला २० रुपये + जीएसटी इतकं शुल्क भरावं लागेल. १ मे २०२५ पासून एसबीआय ग्राहकांना त्यांची मोफत मासिक मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये एटीएम पैसे काढण्यासाठीचं शुल्क भरावं लागेल.