State Bank Of India News: स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) सप्टेंबर महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करत गुरुवारी १०० अब्ज डॉलर मार्केट कॅपचा टप्पा ओलांडला. सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या वाढत्या खर्चामुळे कर्जामध्ये झालेल्या वाढीमुळे देशातील या सर्वात मोठ्या बँकेला बाजाराच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी करण्यास मदत मिळाली.
ही कामगिरी अशा वेळी झाली आहे, जेव्हा एसबीआयनं एकूण व्यवसायात १०० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत, बँकेचं एकूण कर्ज ४४.२० लाख कोटी रुपये आणि जमा ५५.९२ लाख कोटी रुपये राहिले.
देशातील प्रमुख कंपन्यांमध्ये समावेश
मार्केट कॅपच्या बाबतीत, रिलायन्स इंडस्ट्रीज २२८ अब्ज डॉलर्ससह पहिल्या स्थानावर आहे. यादीत एचडीएफसी बँक १७० अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर असून, भारती एअरटेल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि आयसीआयसीआय बँक सुद्धा १०० अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्यांसह सामील आहेत. विशेष म्हणजे, या समूहात समाविष्ट असलेल्या सहापैकी तीन बँकाच आहेत, जे जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतामध्ये बँकिंग क्षेत्राची वाढती ताकद दर्शवते.
आयटी कंपन्यांचं मूल्य घटलं
इन्फोसिसनं सप्टेंबर २०२१ मध्ये १०० अब्ज डॉलर्सचा बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला होता, परंतु आता त्याचं मूल्य अंदाजे ७० अब्ज डॉलर्स इतकंच राहिले आहे. आयटी शेअर्समध्ये सुरू असलेली मंदी आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे सतत कमकुवत होणं हे या घसरणीचं कारण आहे.
सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणाचा फायदा
एसबीआयचे चेअरमन सीएस सेट्टी यांनी सांगितलं की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणामुळे उद्योगाला स्पष्टपणे फायदा झाला आहे. सार्वजनिक बँकांची संख्या २६ वरून १२ पर्यंत कमी झाली आहे, ज्यामुळे त्यांना व्यावसायिक फायदा मिळाला आहे. सेट्टी म्हणाले की, तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी बँकेचा मोठा आकार असणं खूप महत्त्वाचं आहे. पुरेसा आकार नसल्यास तंत्रज्ञानातील गुंतवणुकीचं समर्थन करणं कठीण आहे. भविष्यात या क्षेत्रात आणखी विलीनीकरण होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
सप्टेंबर तिमाहीचे मजबूत निकाल
सप्टेंबर २०२५ मध्ये संपलेल्या तिमाहीत एसबीआयचं निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३% वाढून ४२,९८५ कोटी रुपये राहिलं, जे बाजाराच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. बँकेनं या दरम्यान २०,१६० कोटी रुपये चा निव्वळ नफा (Net Profit) नोंदवला, जो मागील वर्षापेक्षा १०% अधिक आहे. या कालावधीत येस बँक मधील आपला हिस्सा विकून मिळालेल्या ४,५९३ कोटी रुपयांच्या नफ्यानं बँकेच्या निकालांना अधिक मजबूत केलंय.
