Cheap Home Loan EMI: जर तुम्ही स्वतःचं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर होम लोनचा व्याजदर आणि ईएमआय (EMI) ची योग्य निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एसबीआय (SBI), बँक ऑफ बडोदा (BoB) आणि बँक ऑफ महाराष्ट्र (BoM) यांसारख्या प्रमुख सरकारी बँका सध्या आकर्षक गृहकर्ज ऑफर करत आहेत. परंतु, यापैकी सर्वात स्वस्त कर्ज कोण देत आहे? आम्ही ६० लाख रुपयांच्या कर्जासाठी २० वर्षांच्या कालावधीसाठी ताज्या व्याजदरांच्या आधारे EMI ची तुलना केली आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या बँकेत सर्वाधिक फायदा होईल हे समजू शकेल.
सर्वात स्वस्त होम लोन कोणाला मिळते?
कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था त्यांच्या सर्वात कमी व्याजदराची ऑफर अशा ग्राहकांना देते जे गृहकर्जाच्या पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण करतात. तुमचं वय, उत्पन्न, सिबिल (CIBIL) स्कोअर आणि क्रेडिट हिस्ट्री यांचे मूल्यांकन केल्यानंतरच गृहकर्ज मंजूर केलं जातं. सामान्यतः ८०० किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोअर असलेल्या ग्राहकांना बँका सुरुवातीच्या म्हणजेच सर्वात स्वस्त व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करून देतात. मात्र, अंतिम निर्णय बँकेचाच असतो.
एसबीआय (SBI) होम लोन
अधिकृत वेबसाइटनुसार, भारतीय स्टेट बँक (SBI) सध्या नवीन ग्राहकांना ७.२५ टक्के सुरुवातीच्या व्याजदराने गृहकर्ज ऑफर करत आहे.
बँक ऑफ बडोदा (BoB) होम लोन
बँक ऑफ बडोदा देखील सध्या ७.२० टक्के सुरुवातीच्या व्याजदरानं गृहकर्ज देत आहे. बँक या कर्जावर कोणतेही छुपे शुल्क (Hidden charges) घेत नाही, तसंच प्री-पेमेंटवर कोणताही दंड आकारला जात नाही. तुम्ही जास्तीत जास्त ३० वर्षांपर्यंतच्या कालावधीची निवड करू शकता. तसेच, 'डेली रिड्यूसिंग बॅलन्स'वर व्याजदर लागू होईल.
बँक ऑफ महाराष्ट्र होम लोन
बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँक ऑफ महाराष्ट्र सध्या ७.१० टक्के या सुरुवातीच्या दरानं गृहकर्ज ऑफर करत आहे. इतकंच नाही तर बँक महिला आणि संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना (Defense Personnel) व्याजदरात ०.०५ टक्क्यांची अतिरिक्त सूट देखील देत आहे. प्री-पेमेंट किंवा प्री-क्लोजरवर तुम्हाला कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. भारतात सर्वात स्वस्त व्याजदरानं गृहकर्ज देत असल्याचा दावा बँकेनं केला आहे. वरील तिन्ही बँकांच्या व्याजदराची तुलना केल्यास बँक ऑफ महाराष्ट्रचे गृहकर्ज सर्वात स्वस्त आणि आकर्षक असल्याचं दिसून येतं.
₹६० लाखांच्या कर्जावर २० वर्षांसाठी किती EMI?
जर तुम्ही सर्वात स्वस्त म्हणजेच ७.१० टक्के व्याजदराने बँकेकडून ६० लाख रुपयांचे गृहकर्ज २० वर्षांसाठी घेतलं, तर होम लोन कॅल्क्युलेटरनुसार तुमचा मासिक EMI ४६,८७९ रुपये होईल. गणनेनुसार, या कर्जावर तुम्ही व्याजापोटी ५२,५०,९०४ रुपये द्याल. म्हणजेच, मुद्दल आणि व्याज मिळून तुम्ही बँकेला एकूण १,१२,५०,९०४ रुपये परत कराल.
