भारतीय साबण बाजारातून मोठी बातमी आली आहे. गेली अनेक दशके या बाजारावर वर्चस्व गाजवणाऱ्या मोठ मोठ्या ब्रँड्सना 'दे धक्का' देत आता 'संतूर'ने भारतातील पहिल्या क्रमांकाचा 'ताज' धारण केला आहे. आता संतूर भारतातील पहिल्या क्रमांकाचा साबण ब्रँड बनला असल्याचा दावा विप्रो कंज्यूमर केयर अँड लाइटिंगने (WCCL) ने केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये संतूरने २,८५० कोटी रुपयांचा महसूल मिळवून हिंदुस्थान युनिलिव्हरच्या 'लाइफबॉय'ला पिछाडीवर टाकले असून या शर्यतीत 'लक्स' तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपन्यांना प्रत्येक ब्रँडचा स्वतंत्र महसूल जाहीर करणे बंधनकारक नसल्यामुळे या दाव्यांची अधिकृत पुष्टी करणे कठीण आहे.
टीओआयच्या वृ्त्तानुसार, विप्रो कंझ्युमर केअरच्या म्हणण्यानुसार, WCCL चे सीईओ विनीत अग्रवाल म्हणाले, "विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतूर आणि लाइफबॉयच्या महसुलात मोठे अंतर असून संतूर आघाडीवर आहे." AC Nielsen च्या जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, संतूरचे बाजारातील वाटा 8.7% होता तर लाइफबॉयचा वाटा 12.1% आणि लक्सजा 12.2% एवढा होता.
मात्र, अग्रवाल यांनी या आकडेवारीवर आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, नेल्सनचे सर्वेक्षण ग्रामीण भागातील आणि विशेषतः आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात यांसारख्या राज्यांतील संतूरच्या मजबूत विक्रीला पुरेसे प्रतिनिधित्व देत नाही.
दुसऱ्या बाजूला हिंदुस्थान युनिलिव्हरसंदर्भात बोलायचे झाल्यास, कंपनीने या दाव्यावर थेट भाष्य करणे टाळले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, आम्ही स्पर्धात्मक आकलनासाठी नेल्सन आणि कांतार (Kantar) सारख्या संस्थांच्या डेटाचा आधार घेतो. आम्ही स्वतंत्र ब्रँडची बाजारहिस्सेदारी जाहीर करत नाही.
