नवी दिल्ली : यंदा भारतात दिवाळीच्या काळात विक्रमी ६.०५ लाख कोटी रुपयांची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांची शिखर संघटना ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (कैट) सांगितले. त्यापैकी ५.४० लाख कोटी रुपये वस्तूंच्या विक्रीतून आणि ६५,००० कोटी रुपये सेवांमधून आले आहेत.
कैटनुसार, यंदा जीएसटी दरकपात आणि मजबूत ग्राहक विश्वासामुळे विक्रीत मोठी वाढ झाली. देशभरातील ६० प्रमुख केंद्रांवरील सर्वेक्षणाच्या आधारे हे आकडे जारी करण्यात आले. गेल्या वर्षी ही विक्री ४.२५ लाख कोटी रुपये इतकी होती. दिवाळीमुळे सुमारे ५० लाख तात्पुरत्या रोजगारांची निर्मिती झाली. त्यात ग्रामीण भागाचा वाटा २८ टक्के राहिला.