Berkshire Hathaway CEO Salary: जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक असलेले वॉरेन बफे ३१ डिसेंबर २०२५ रोजी बर्कशायर हॅथवेच्या (Berkshire Hathaway) CEO पदावरून निवृत्त झाले आहेत. १ जानेवारी २०२६ पासून कंपनीची धुरा ग्रेग एबेल (Greg Abel) यांनी सांभाळली आहे. मात्र, बफे पूर्णपणे निवृत्त होत नसून ते 'चेअरमन' म्हणून कंपनीत सक्रिय राहतील. ग्रेग एबेल गेल्या ८ वर्षांपासून बर्कशायरमध्ये व्हाईस चेअरमन म्हणून कंपनीचा नॉन-इन्शुरन्स बिझनेस सांभाळत होते.
बफे यांच्या पगाराहून अनेक पटींनी जास्त पगार
ग्रेग एबेल यांना दीर्घकाळापासून बफे यांचे उत्तराधिकारी मानले जात होते. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, बर्कशायर हॅथवेनं त्यांचे नवे सीईओ ग्रेग एबेल यांचा वार्षिक पगार वाढवून २.५ कोटी डॉलर केला आहे. ही रक्कम वॉरेन बफेट यांनी ४० वर्षांहून अधिक काळ कंपनी चालवताना घेतलेल्या १ लाख डॉलरच्या पगारापेक्षा कितीतरी जास्त आहे. बफे यांनी डिसेंबरच्या अखेरीस दैनंदिन जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला. ६३ वर्षीय ग्रेग एबेल यांनी १ जानेवारीपासून सीईओ पद स्वीकारलं असून, बर्कशायरच्या इतिहासात ६० वर्षांनंतर सर्वोच्च पदावर झालेला हा पहिला मोठा बदल आहे.
ग्रेग एबेल यांचा आतापर्यंतचा पगार
२०२४: २.१ कोटी डॉलर
२०२३: २ कोटी डॉलर
२०२२: १.६ कोटी डॉलर पगार आणि ३० लाख डॉलर बोनस. वॉरेन बफे यांनी अशाच प्रकारचं सॅलरी पॅकेज अजित जैन यांच्यासाठी देखील मंजूर केलं होतं, जे बर्कशायरचा इन्शुरन्स बिझनेस पाहतात. मात्र, २०२५ साठी एबेल आणि जैन यांच्या पगाराचा खुलासा अद्याप झालेला नाही.
१ ट्रिलियन डॉलरची कंपनी आणि २०० उपकंपन्या
ओमाहा स्थित बर्कशायर हॅथवेचं नेतृत्व यांनी ६० वर्षांहून अधिक काळ केलं. त्यांनी एका कमकुवत टेक्स्टाईल कंपनीचं रूपांतर १ ट्रिलियन डॉलरहून अधिक मूल्य असलेल्या एका महाकाय व्यावसायिक समूहात केलं. आज बर्कशायरकडे विमा, रेल्वे, ऊर्जा, मॅन्युफॅक्चरिंग आणि रिटेल अशा विविध क्षेत्रातील सुमारे २०० कंपन्या आहेत. यामध्ये Geico कार इन्शुरन्स, BNSF रेल्वे, एक मोठे युटिलिटी नेटवर्क आणि See’s Candies व Brooks सारखे प्रसिद्ध ब्रँड्स समाविष्ट आहेत.
बफे आजही जगातील श्रीमंतांच्या यादीत
निवृत्त होऊनही वॉरेन बफेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत आणि ते बर्कशायरचे चेअरमन म्हणून कायम राहतील. त्यांच्या कार्यकाळात कंपनीनं अनेकदा सांगितलं की, त्यांची एक्झिक्युटिव्ह सॅलरी देण्याची पद्धत इतर कंपन्यांपेक्षा वेगळी आहे. दुसरीकडे, ग्रेग एबेल यांच्या वैयक्तिक संपत्तीचा मोठा हिस्सा बर्कशायरशी जोडलेला आहे. त्यांच्याकडे सुमारे १७.१ कोटी डॉलरचे बर्कशायरचे शेअर्स आहेत. याव्यतिरिक्त, २०२२ मध्ये त्यांनी बर्कशायर हॅथवे एनर्जीमधील आपला १% हिस्सा मूळ कंपनीला ८७ कोटी डॉलरमध्ये विकला होता.
