Arjun Tendulkar Saaniya Chandhok: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा ५ मार्च २०२६ रोजी सानिया चंडोक हिच्यासोबत विवाहसोहळा पार पडणार आहे. हा विवाह सोहळा मुंबईत एका खाजगी समारंभात पार पडेल, ज्यामध्ये केवळ कुटुंबिय आणि जवळचे मित्र सहभागी होतील. लग्नाचे विधी ३ मार्चपासून सुरू होणारेत. अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एका साध्या समारंभात झाला होता, ज्याला खुद्द सचिन तेंडुलकरनं दुजोरा दिला होता. सानिया चंडोक ही मुंबईतील एका नामांकित व्यावसायिक कुटुंबातील आहे. ती मुंबईतील मोठे उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया 'मिस्टर पॉज' नावाच्या लक्झरी पेट स्पाची संस्थापक आणि संचालिकादेखील आहे.
सचिन तेंडुलकरचे होणारे व्याही आणि घई कुटुंब
अर्जुन तेंडुलकर, जो क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे, तो ५ मार्च रोजी सानिया चंडोकसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलीये. सचिनची होणारी सून सानिया चंडोक ही 'ग्रेविस ग्रुप'चे प्रमुख रवी घई यांची नात आहे. हा समूह हॉटेल आणि खाद्यपदार्थ क्षेत्रात विस्तारलेला आहे. रवी घई यांचा मरीन ड्राईव्ह येथील 'इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल'शी संबंध आहे, तसेच ते 'द ब्रुकलिन क्रीमरी' या ब्रँडचे मालक आहेत.
रविवारी की सोमवारी, केव्हा सादर होणार देशाचा अर्थसंकल्प; तारखेवर शिक्कामोर्तब, जाणून घ्या
रवी घईंनी उभे केले अनेक मोठे ब्रँड्स
रवी घई यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी १९६७ मध्ये वडील इक्बाल किशन घई यांचा व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. आपल्या व्यावसायिक प्रवासात त्यांनी 'क्वॉलिटी आईस्क्रीम' आणि 'नटराज हॉटेल'ची (जे आता इंटरकॉन्टिनेंटल आहे) सुरुवात केली. त्यांनी सार्क (SAARC) देशांमध्ये 'बास्किन-रॉबिन्स'ची फ्रँचायझी देखील सुरू केली. ते सध्या 'ग्रेविस हॉस्पिटॅलिटी लिमिटेड'चे नॉन-एग्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत. याशिवाय, ते क्वॉलिटी रीड इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि परफेक्ट लाइव्हस्टॉक एलएलपी सारख्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर आहेत.
कुटुंबातील वाद आणि सानियाचा व्यावसायिक प्रवास
काही महिन्यांपूर्वी रवी घई यांच्या कुटुंबात मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 'फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार, रवी घई यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आपला मुलगा गौरव घई याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती. गौरव यांनी त्यांच्या स्वाक्षरीचा गैरवापर केला आणि फसवणूक केली, असा आरोप रवी घई यांनी केला होता. त्यांच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान गौरवनं कंपनीचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेतलं आणि त्यांचे पैसेही बंद केले, असेही तक्रारीत म्हटलं होतं.
आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे नेत सानियाने देखील उद्योजकता क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. ती मुंबईत 'मिस्टर पॉज' नावाच्या लक्झरी पेट स्पाची संस्थापक आणि संचालिका म्हणून कार्यरत आहे.
