मुंबई : भारतातून परदेशी गुंतवणूक सतत बाहेर गेल्याने, व्यापार तूट वाढल्याने तसेच अमेरिकेसोबतचा व्यापार करार होत नसल्याने बुधवारी इतिहासात प्रथमच डॉलरच्या तुलनेत रुपया ९०च्या खाली घसरला आहे. बुधवारी रुपयांत २५ पैशांची घसरण होत तो ९०.२१ वर गेला आहे. घसरण झाल्याने रुपयाची आशियातील चलनांमध्ये सर्वांत वाईट कामगिरी ठरली आहे. या घसरणीमुळे देशात महागाई वाढणार असून, आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरण
१०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त विदेशी गुंतवणूक यावर्षी भारतात येईल, असे केंद्र सरकारने एफडीआयबाबत म्हटले आहे.
सरकार म्हणते, झोप उडाली नाही
रुपया ९०च्या वर गेल्याप्रकरणी सरकारला कोणतीही चिंता नाही. यामुळे सरकारची झोप उडाली नाही. तो पुढील वर्षी सुधारू शकतो, असे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे.
घसरलेला रुपया निर्यातीला आधार देतो, परंतु आयात अधिक महाग होते. पेट्रोलियम, इलेक्ट्रॉनिक्स आणि दागिने क्षेत्रांवर यामुळे दबाव येतो.
यापूर्वी घसरण कधी?
१९९१ आर्थिक संकट, जागतिक मंदी, कोरोना रशिया-युक्रेन युद्ध
रुपयाच्या घसरणीचे फायदे आणि तोटे
फायदे - निर्यातदारांना नफा, पर्यटकांसाठी भारत स्वस्त, वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन, डॉलर्स पाठवल्यावर अधिक पैसे
तोटा - महागाई वाढेल, तेल आणि सोने महाग, परदेशात शिक्षण घेणे महाग, परदेशी गुंतवणूक कमी होईल. रुपया घसरल्याने भारतासाठी आयात महाग होईल.
रुपया ९०वर हे सामान्य : सरकार
भारतातील महागाई जास्त आणि उत्पादकता कमी असल्याने ही घसरण आहे. दरवर्षी रुपयामध्ये दोन-तीन टक्के घसरण सामान्य मानली पाहिजे. निर्यात व्हावी यासाठी घसरण हवी, असेही ते म्हणाले.
५.०६% रुपयातील घसरण ही ३१ डिसेंबर २०२४ ते ३ डिसेंबर २०२५ दरम्यान झाली आहे. ट्रम्प टॅरिफचा फटका रुपयाला बसला.
