Uday Kotak Appartment Deal: कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईतील वरळी येथील एका निवासी संकुलातील १२ सी-फेसिंग अपार्टमेंट्स २०२ कोटी रुपयांना खरेदी केल्या आहेत. याचा सरळ सरळ अर्थ असा की, त्याने २०२ कोटी रुपयांना १२ फ्लॅटचा व्यवहार केलाय. हे सर्व अपार्टमेंट सागर बिल्डिंग नावाच्या निवासी संकुलात आहेत. समुद्राच्या दिशेनं असलेल्या या फ्लॅटमधून समुद्राचं दृश्य रात्री अतिशय नयनरम्य दिसतं. रिपोर्टनुसार, या १२ अपार्टमेंट्सची एकूण किंमत २०२ कोटी रुपये असल्याचे सांगितलं जात आहे.
सर्वात महागडी निवासी मालमत्ता
या घरांसाठी त्यांनी प्रति स्क्वेअर फूट २ लाख ७१ हजार रुपये मोजले आहेत. जी देशातील कोणत्याही निवासी मालमत्तेची आतापर्यंतची सर्वात महागडी खरेदी आहे. यापूर्वी दक्षिण मुंबईतील अल्टामाऊंट रोड आणि भुलाभाई देसाई रोड येथेही विक्रमी विक्री झाली होती. तेव्हा त्याचे दर सव्वा दोन लाख रुपये आणि दोन लाख नऊ हजार रुपये प्रति चौरस फूट नोंदवण्यात आले. सागर बिल्डिंगमधून अरबी समुद्र आणि मुंबई कोस्टल रोडचं विहंगम दृश्य दिसते. या भागात अनेक हाय नेटवर्थ असलेल्या व्यक्ती राहतात. इथल्या भाववाढीचं हेही एक कारण आहे.
१२ कोटींचं मुद्रांक शुल्क
कोटक कुटुंबाने या सदनिकांच्या खरेदीसाठी १२ कोटींहून अधिक मुद्रांक शुल्क भरलं आहे. याशिवाय सुमारे ३ लाख ६० हजार रुपये नोंदणी शुल्कही भरण्यात आलंय. १२ पैकी एका फ्लॅटची नोंदणी ५ सप्टेंबर २०२४ रोजी, तर उर्वरित ११ अपार्टमेंटची नोंदणी ३० जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली होती. या अपार्टमेंट्सचा कार्पेट एरिया १७३ चौरस फूट ते १३९६ चौरस फूट आहे. सर्व १२ अपार्टमेंटचा एकूण आकार ७,४१८ चौरस फुटांच्या आसपास आहे.
३८५ कोटींचा बंगला खरेदी केलेला
लाइव्ह मिंटनुसार, कोटक महिंद्रा बँकेशी संपर्क साधला असता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. उदय कोटक यांनी वरळी सी फेस एरियामध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१८ मध्ये त्यांनी ३८५ कोटी रुपयांना बंगला खरेदी केला होता. पूर्वी इंडेज विंटनर्सचे (आताचे शॅम्पेन इंडेज लिमिटेड) कार्यकारी रणजित चौगुले यांची ती मालमत्ता होती. उदय कोटक यांनी खरेदी केलेले हे नवे १२ फ्लॅट त्याच बंगल्याजवळ आहेत.