Royal Enfield Sale : सणासुदीच्या काळात बाईक आणि कार खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. जीएसटी दर कपातीमुळे यापूर्वीच विक्रीत मोठी वाढ झाली होती. मात्र, आता बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. प्रीमियम मोटारसायकल कंपनी असलेली रॉयल एनफिल्डने आपल्या बाईक्स आता थेट ऑनलाईन ई-कॉमर्स मंचावर उपलब्ध केल्या आहेत. याचा अर्थ, रॉयल एनफिल्डची बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला शोरूममध्ये जाण्याची गरज नाही; तुम्ही तुमच्या पसंतीची बाईक आता घरबसल्या ऑर्डर करू शकता!
शोरूमला जाण्याची गरज नाही
रॉयल एनफिल्डने घोषणा केली आहे की, त्यांच्या ब्रँडच्या ३५० सीसी रेंजमधील सर्व मोटारसायकल आता ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
अमेझॉनवर उपलब्ध मॉडेल्स : क्लासिक ३५, बुलेट ३५०, हंटर ३५०, गोअन क्लासिक ३५० आणि नवीन मेट्योर ३५०.
ग्राहक ऑनलाईन ऑर्डर नोंदवल्यानंतर आपल्या पत्त्यावर बाईकची डिलिव्हरी घेऊ शकतात.
पुणे-मुंबईसह प्रमुख शहरांत सेवा सुरू
कंपनीने आपल्या ग्राहकांना घरपोच डिलिव्हरीची सेवा देण्यासाठी देशातील प्रमुख शहरांची निवड केली आहे.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सेवा सुरू असलेली शहरे
अमेझॉन : अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली आणि पुणे
फ्लिपकार्ट : बंगळूरु, गुरुग्राम, कोलकाता, लखनऊ आणि मुंबई
ऑनलाईन बाईक खरेदी केल्यानंतरही ग्राहकांना सर्व सुविधा मिळतील. बाईकची डिलिव्हरी, सर्व्हिसिंग आणि इतर कामे ग्राहकांच्या शहरात असलेल्या रॉयल एनफिल्डच्या डीलरशिपद्वारेच केली जातील.
विक्रमी विक्री आणि कंपनीचा अंदाज
- रॉयल एनफिल्डने सप्टेंबर महिन्यात आजवरची सर्वात जास्त विक्री नोंदवली आहे. सणासुदीच्या हंगामामुळे कंपनीने सप्टेंबरमध्ये १,२४,३२८ बाईक्सची विक्री केली. ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी अधिक आहे.
- कंपनीला विश्वास आहे की, आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्यामुळे त्यांची विक्री आणखी वाढेल आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.
- अनेकदा अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या फ्लॅटफॉर्मवर बँक ऑफर्स, क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १० हजार रुपयांपर्यंत बचत होते. त्यामुळे ग्राहकांसाठीही चांगली बातमी आहे.