Rolls-Royce : लक्झरी रॉल्स रॉयस कार आपल्याकडे असावी, असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, ब्रिटनमध्ये तयार होत असल्याने भारतात येईपर्यंत या कारची किंमत प्रचंड वाढते. पण, आता या वाहनांच्या किमती ४० टक्केपर्यंत स्वस्त होण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात आलिशान कार आणि जेट इंजिन निर्माता कंपनी रॉल्स-रॉयस आता भारताला आपला तिसरा सर्वात मोठा घरगुती बाजार बनवण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुफान एर्गिनबिलगिच यांनी आपल्या भारत दौऱ्यात ही घोषणा केली आहे. या निर्णयामुळे केवळ अत्याधुनिक अभियांत्रिकी क्षेत्रालाच चालना मिळणार नाही, तर भारतात रॉल्स रॉयस कारच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२०३० पर्यंत पुरवठा साखळी होणार दुप्पट
रॉल्स रॉयसचा भारतात ९० वर्षांचा इतिहास आहे. कंपनीने आपला 'ग्लोबल कॅपेबिलिटी अँड इनव्होवेशन सेंटर' विस्तारला असून, एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात भारतीय भागीदारांसोबत काम अधिक तीव्र केले आहे. २०३० पर्यंत भारतातून होणारी 'सप्लाय चेन सोर्सिंग' किमान दुप्पट करणे. २०२६-२७ पर्यंत डेटा सेंटर्स, सेमीकंडक्टर साइट्स आणि फॅक्टरींमधील वाढत्या मागणीमुळे कंपनीचा खाजगी वीज यंत्रणा व्यवसाय सरकारी पुरवठ्यापेक्षा जास्त होईल.
किमतीत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत कपात शक्य?
रॉल्स रॉयसच्या कार आणि इंजिनच्या किमती कमी होण्यामागे भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार आणि 'कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड एग्रीमेंट' ही मुख्य कारणे आहेत. जुलै २०२५ मध्ये झालेल्या करारानुसार, ब्रिटनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील 'टॅरिफ' कमी होणार आहेत. सध्या १० टक्क्यांपर्यंत ड्युटी कमी करण्याचे प्रस्तावित आहे. सध्या भारतात रॉल्स रॉयसची किंमत ७ ते १२ कोटींच्या घरात आहे. मात्र, स्थानिक सोर्सिंग २०-३० टक्क्यांनी वाढल्यास आणि आयात शुल्क कमी झाल्यास कारच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत मोठी घट होऊ शकते. याचा थेट फायदा भारतीय एअरलाईन्स, नौदल आणि उद्योगांना होईल, कारण त्यांना लागणारी जेट इंजिन आणि पॉवर सिस्टम स्वस्त मिळतील.
'मेक इन इंडिया'ला मोठी बळकटी
रॉल्स रॉयसने अद्याप नवीन उत्पादन युनिटची अधिकृत घोषणा केलेली नाही, तरीही भारताला तिसरा मोठा बाजार मानल्यामुळे इथल्या उत्पादन क्षमतेत वाढ होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या भारत दौऱ्याचा भाग म्हणून आलेल्या या शिष्टमंडळाने स्पष्ट केले की, भारत हा आता प्रगत अभियांत्रिकीचा जागतिक हब बनत आहे.
भारताचे महत्त्व का वाढले?
- भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि संरक्षणाची गरज.
- स्थानिक भागीदारीमुळे भारतात रोजगाराच्या संधी आणि नवीन तंत्रज्ञान येणार आहे.
- डिजिटल इंडियामुळे डेटा सेंटर्सना लागणाऱ्या बॅकअप पॉवरसाठी रॉल्स-रॉयसच्या 'एमटीयू' इंजिनांना मोठी मागणी आहे.
