Rolls-Royce Investment : लक्झरी कार आणि एअरो-इंजिन निर्मितीतील जागतिक दिग्गज कंपनी रॉल्स रॉयस आता भारताला आपले 'दुसरे घर' बनवण्यासाठी सज्ज झाली आहे. ब्रिटनबाहेर अमेरिका आणि जर्मनीनंतर भारत हे कंपनीचे तिसरे 'होम मार्केट' असेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा कंपनीने रविवारी केली. जेट इंजिन, नौदल संरक्षण प्रणाली आणि प्रगत अभियांत्रिकी क्षेत्रातील संधींचे सोने करण्यासाठी कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे.
फायटर जेटला मिळणार बळ
रॉल्स रॉयस इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष साशी मुकुंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या महत्त्वाकांक्षी 'प्रगत मध्यम लढाऊ विमान' कार्यक्रमांतर्गत पुढील पिढीची एअरो-इंजिन विकसित करणे ही कंपनीची प्राथमिकता आहे. यामुळे भारताला स्वदेशी बनावटीची लढाऊ विमाने तयार करण्यास मोठी मदत होईल.
भारतीय नौदलासाठी 'इलेक्ट्रिक प्रोपल्शन'
केवळ हवाई दलच नाही, तर भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठीही रॉल्स रॉयस पुढाकार घेत आहे. कंपनी नौदलाच्या युद्धनौकांसाठी इलेक्ट्रिक प्रोपल्शन तंत्रज्ञान पुरवण्यास उत्सुक आहे. एअरो-इंजिनच्या गाभ्याचा वापर करून नौदलासाठी गॅस टर्बाइन तयार करण्याची क्षमता रॉल्स रॉयसकडे आहे. यामुळे हवाई आणि सागरी संरक्षणासाठी एकच पुरवठा साखळी वापरता येईल.
दोन सरकारी कंपन्यांसोबत करार
रॉल्स रॉयस लवकरच भारताच्या दोन संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांसोबत सामंजस्य करार करणार आहे.
- अर्जुन टँक : 'अर्जुन' रणगाड्यांसाठी शक्तिशाली इंजिनची निर्मिती करणे.
- फ्युचर कॉम्बॅट वेहिकल्स : भविष्यातील युद्धनौका आणि लढाऊ वाहनांसाठी आधुनिक इंजिन विकसित करणे.
वाचा - बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
गुंतवणुकीचा आकडा गुलदस्त्यात!
मुकुंदन यांनी गुंतवणुकीची नेमकी रक्कम उघड करण्यास नकार दिला असला, तरी ही गुंतवणूक "इतकी मोठी असेल की सर्वांचे लक्ष वेधून घेईल" असे त्यांनी स्पष्ट केले. या गुंतवणुकीमुळे भारतात केवळ कारखानाच उभा राहणार नाही, तर संपूर्ण 'व्हॅल्यू चेन' आणि 'इकोसिस्टम' विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
