Robert Kiyosaki Warning: सोन्या-चांदीच्या किमतीत गेल्या काही काळात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली आहे. कधी या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला, तर कधी त्यात मोठी घसरण झाली. या पार्श्वभूमीवर 'रिच डॅड पुअर डॅड' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा घेत गुंतवणूकदारांना ती खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर (पूर्वीचे ट्विटर) मंगळवारी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी स्वतः चांदी खरेदी केल्याचे सांगत अमेरिकन डॉलरच्या भविष्याबाबत धोक्याचा इशारा दिलाय.
स्वतः केली चांदीची मोठी खरेदी
रबर्ट कियोसाकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "मी आत्ताच आणखी ६०० 'अमेरिकन सिल्व्हर ईगल्स' खरेदी केले आहेत. आजचा स्पॉट रेट ८२ डॉलर प्रति औंस आहे." अमेरिकन सिल्व्हर ईगल हे अमेरिकेने जारी केलेले अधिकृत चांदीची नाणी आहे, ज्याची सुरुवात १९८६ मध्ये झाली होती. या नाण्यात ९९.९% शुद्ध चांदी असून त्याचं वजन १ ट्रॉय औंस (३१.१ ग्रॅम) असतं. चांदीमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी जगभरात या नाण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
चांदी २०० डॉलरच्या पार जाण्याचा अंदाज
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीच्या किमतीत सध्या मोठी घसरण झाली आहे. भारतात २९ जानेवारी रोजी चांदीच्या किमतीने ४,२०,०४८ रुपये प्रति किलोचा विक्रमी स्तर गाठला होता. मात्र, १० फेब्रुवारीपर्यंत एमसीएक्सवर (MCX) चांदी २,५६,४२४ रुपयांपर्यंत खाली आली आहे, म्हणजेच चांदी आपल्या उच्चांकावरून १,६३,६२४ रुपयांनी स्वस्त झाली आहे. अशा स्थितीत कियोसाकी यांनी ही खरेदीची उत्तम संधी असल्याचं म्हटलंय. त्यांनी अंदाज वर्तवलाय की, २०२६ मध्ये चांदी २०० डॉलर प्रति औंस किंवा त्यापेक्षाही वरच्या पातळीवर पोहोचू शकते.
अमेरिकन डॉलर आणि 'फिएट' चलनाबाबत इशारा
चांदीच्या खरेदीचा सल्ला देतानाच कियोसाकी यांनी अमेरिकन डॉलरवर गंभीर भाष्य केलंय. त्यांनी सावध केलंय की, अमेरिकन डॉलर सध्या संकटात आहे. त्यांच्या मते, जे लोक 'फिएट' चलन (बनावट किंवा कागदी डॉलर) वाचवण्यावर भर देत आहेत, त्यांचं सर्वाधिक नुकसान होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करावं, असा इशारा त्यांनी आपल्या पोस्टद्वारं दिला आहे.
(टीप - हा गुतंवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
