नवी दिल्ली : ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमाला तब्बल दोन लाख कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. या स्टार्टअप्सनी देशभरात २१ लाखांहून अधिक रोजगार निर्माण केले असल्याची माहितीही मंत्रालयाने दिली. डिजिटल अर्थव्यवस्थेपासून ते निर्यात वाढीसाठीच्या योजनांपर्यंत भारताने अलीकडच्या वर्षात केलेल्या वाटचालीचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) दिलेल्या माहितीप्रमाणे २,०१,३३५ स्टार्टअप्सना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. ४८ % स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक असून, यामुळे यात महिलांचा वाढता सहभाग दिसत आहे. पेटंट फायलिंगमध्ये ४२५% वाढ झाली आहे. स्टार्टअप्स मान्यतेनंतर स्टार्टअप्सना आयकर सवलती आणि विविध प्रोत्साहन मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.
‘पीएलआय’चा मोठा फायदा
पीएलआय उत्पादन क्षेत्राला नवसंजीवनी देत आहेत. या योजनेअंतर्गत १४ क्षेत्रात जून २०२५ पर्यंत १.८८ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आली आहे.
यात ७.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या वस्तूंची निर्यात झाली आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्मिती, दूरसंचार-नेटवर्किंग व खाद्यप्रक्रिया क्षेत्रांचा पुढाकार आहे.
१.९७ लाख कोटी रुपयांचा निधी १४ महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी ठेवण्यात आला आहे.
१.८८ लाख कोटींची गुंतवणूक जून २०२५ पर्यंत प्रत्यक्षात झाली आहे.
१७ लाख कोटींचे अतिरिक्त उत्पादन / विक्री झाली आहे.
१२.३ लाख रोजगारनिर्मिती थेट व अप्रत्यक्षरीत्या झाली आहे.
