मुंबई : भारतातील किरकोळ क्षेत्रातील उद्योग २०२१ पर्यंत ८५ लाख कोटींचा होणार असल्याचा अंदाज फिक्की आणि डेलोइट या संस्थांनी व्यक्त केला. त्यांनी संयुक्त अहवालात म्हटले की, या उद्योगात १० टक्क्यांची वाढ अपेक्षित असून आगामी काळात हा उद्योग दुप्पट होईल.
या अहवालानुसार, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्सची (एफएमसीजी) एका नव्या टप्प्यात वाढ होईल. ग्राहक हा किरकोळ उद्योगाचा प्रमुख भाग आहे. या उद्योगाची सध्याची उलाढाल ४५ लाख कोटी रुपये आहे. २०१६ ते २०२१ या काळात या क्षेत्राची वाढ १० टक्क्यांनी होण्याची शक्यता आहे. हा उद्योग ८५ लाख कोटींवर जाईल, असे डेलोइट टोउच तोहमात्सु लिमिटेडचे (डीटीटीएल) भारतातील सहयोगी रजत वाही यांनी व्यक्त केली आहे.
अहवालात असाही अंदाज वर्तविला की, व्यवसाय वाढीसाठी आणि ग्राहक डेटा यात इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. खरेदीदार आणि ग्राहक व्यवहारातून मिळणारी आकडेवारी भविष्यातील व्यवसायासाठी वापरली जाईल आणि ती महत्त्वाची ठरणार आहे.
इंटरनेटच्या आधारे होणारे विश्लेषणही आधार ठरणार आहे. स्मार्टफोन, अॅप्स, वेब, सोशल मीडियाचा वापर वाढल्याने आॅफलाइन आणि आॅनलाइन सेवांचे एकत्रीकरण करून सर्व किरकोळ व्यवहारांचा विकास होईल.
डिजिटल मार्केटिंगवर भर-
या अहवालानुसार, जाहिरातदारांकडून डिजिटल मार्केटिंगवर होणारा खर्च पुढील ४ वर्षांत दुप्पट होणार आहे. हा खर्च एकूण खर्चाच्या २४ टक्के एवढा असणार आहे.
जाहिरातींची ही नवी पद्धत रूढ होणार आहे. किरकोळ क्षेत्रातील उद्योगांमधील संधी पाहता डिजिटल मार्केटिंगवर भर असणार आहे. म्हणजेच जाहिरातींचे क्षेत्रही आता चौकट मोडून नव्या रूपात दिसणार आहे.
किरकोळ वस्तूंचा उद्योग होणार ८५ लाख कोटींचा;फिक्की, डेलोइटचा दुप्पट वाढीचाही अंदाज
भारतातील किरकोळ क्षेत्रातील उद्योग २०२१ पर्यंत ८५ लाख कोटींचा होणार असल्याचा अंदाज फिक्की आणि डेलोइट या संस्थांनी व्यक्त केला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:10 AM2017-09-09T01:10:45+5:302017-09-09T01:11:29+5:30