दिवाळीपूर्वीच भारत सरकारने देशातील सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. Next-Gen GST सुधारणा जाहीर करताना सरकारने कर रचना अधिक सोपी केली असून आता फक्त दोनच स्लॅब राहणार आहेत ते म्हणजे ५% आणि १८%. आलिशान व "sin goods" साठी स्वतंत्र ४०% स्लॅब लागू करण्यात आला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, बटर, तूप, भांडी, शिवणयंत्र यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंवरील GST १८% वरून ५% करण्यात आल्यानं घरगुती खर्चात लक्षणीय बचत होईल.
शेती क्षेत्रातही मोठा दिलासा देण्यात आला आहे. ट्रॅक्टर, ड्रिप इरिगेशन, कृषी मशिनरी आणि पोषकतत्त्वांवरील कर कमी करण्यात आला आहे. यामुळे उत्पादन खर्च घटेल आणि शेती अधिक परवडणारी होईल.
आरोग्य क्षेत्रातील बदलही उल्लेखनीय आहेत. आरोग्य व जीवन विम्यावर GST पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. ऑक्सिजन, डायग्नोस्टिक किट्स, थर्मामीटर यांवरील करही कमी झाल्याने उपचार खर्च कमी होईल. शिक्षण क्षेत्रात नकाशे, वह्या, खडू, इरेजर यांसारख्या वस्तूंवरून GST हटवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे. वाहनं आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील ग्राहकांसाठीही आनंदाची बातमी आहे. हायब्रिड कार, मोटारसायकल, तीन-चाकी वाहने, एसी, टीव्ही, मॉनिटर्स यांवरील GST २८% वरून १८% करण्यात आला आहे.
या बदलांवर उद्योजक आणि उद्योगक्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रसिद्ध उद्योगपती आणि MSME क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व मिलिंद पोटे यांनी या सुधारणा स्वागतार्ह असल्याचं म्हटलं. "या निर्णयामुळे देशांतर्गत मागणी वाढेल, लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार निर्मितीला नवीन दिशा मिळेल. महसुलात तात्पुरती घट झाली तरी दीर्घकालीन दृष्टीनं अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल," असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुधारणा प्रत्येक भारतीयासाठी दिवाळीचे खरे गिफ्ट असल्याचं सांगितलं आहे. या बदलांची अंमलबजावणी २२ सप्टेंबर २०२५ पासून होणार आहे. एकूणच, या GST सुधारणा केवळ कर रचना सुलभ करत नाहीत, तर घरगुती बजेटपासून ते उद्योगाच्या वाढीपर्यंत सर्वच स्तरांवर सकारात्मक परिणाम घडवतील, अशी अपेक्षा असल्याचंही त्यांनी नमूद केलं.