closed loop e wallets : देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा पुरवणारी कंपनी ब्लूस्मार्ट (BluSmart) अचानक बंद झाल्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये असलेले पैसे परत मिळवण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांशी जोडलेल्या काही डिजिटल वॉलेटची चौकशी करत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे 'क्लोज्ड-लूप वॉलेट' चर्चेत येत आहे. कारण, अशाच प्रकारची सेवा अन्य कंपन्याही देत आहेत. त्यामुळे भविष्यात गंभीर स्थित निर्माण होऊ शकते.
वृत्तानुसार, ब्लूस्मार्ट कंपनीविरुद्ध फसवणुकीचे आरोप झाले आहेत. यामुळे कंपनीच्या ॲपवर असलेले 'क्लोज्ड-लूप वॉलेट' मध्ये पैसे जमा करणाऱ्या ग्राहकांच्या पैशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वॉलेटचा वापर ग्राहक टॅक्सी बुक करण्यासाठी किंवा चार्जिंग स्टेशन वापरण्यासाठी करत होते.
क्लोज्ड-लूप वॉलेट म्हणजे काय?
क्लोज्ड-लूप वॉलेट हे ॲप आधारित पेमेंटचे एक माध्यम आहे, जे फक्त त्याच विशिष्ट प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ, पेटीएम फास्टॅग किंवा अमेझॉन पे बॅलन्स. या वॉलेटमधील पैसे सहजासहजी बँकेत परत पाठवता येत नाहीत. तसेच, या वॉलेटच्या वापराचे नियम आणि शिल्लक कंपनीद्वारेच ठरवले जातात.
आरबीआयकडून चौकशी
ब्लूस्मार्ट कंपनी बंद झाल्यानंतर ग्राहकांच्या पैशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर बनला आहे. त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने आता इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन चालवणारे आणि इतर ॲप आधारित इलेक्ट्रिक वाहन सेवा पुरवठादारांशी चर्चा सुरू केली आहे. जेणेकरून ग्राहकांच्या पैशांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल.
वाचा - शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
ग्राहकांना दिलासा मिळणार?
सेबीने (SEBI) काही दिवसांपूर्वी जेन्सोल इंजिनिअरिंगच्या मालकांविरुद्ध फसवणूक उघडकीस आणल्यानंतर ब्लूस्मार्ट कॅब सेवा बंद झाली आहे. या घटनेमुळे क्लोज्ड-लूप वॉलेटमधील पैशांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आणि म्हणूनच आरबीआय या संपूर्ण पेमेंट प्रणालीची कसून चौकशी करत आहे. आता ब्लूस्मार्टचे ग्राहक त्यांच्या वॉलेटमधील पैसे कसे परत मिळवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या चौकशीनंतर ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.