India GDP : नवीन वर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत सकारात्मक बातमी आली आहे. वाढती देशांतर्गत मागणी, महागाईवरील नियंत्रण आणि बँकांची सुधारलेली आर्थिक स्थिती यामुळे देशाच्या विकासाचा वेग अधिक गतीने वाढताना दिसत आहे. रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या 'वित्तीय स्थिरता अहवालात' भारतीय बँकिंग व्यवस्था सध्या अत्यंत सुरक्षित आणि मजबूत असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
बँकिंग क्षेत्राची कामगिरी: एनपीए ऐतिहासिक नीचांकी पातळीवर
आरबीआयच्या अहवालानुसार, देशातील अनुसूचित व्यावसायिक बँकांकडे पुरेसे भांडवल आणि रोकड सुलभता आहे. बँकांच्या कर्जाची गुणवत्ता सुधारली असून नफ्यातही मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये बँकांचा ढोबळ एनपीए गुणोत्तर २.१% होता, जो मार्च २०२७ पर्यंत १.९% पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे भांडवल प्रमाण १६% तर खासगी बँकांचे १८.१% राहिले आहे, जे जागतिक मानकांनुसार समाधानकारक आहे. बँका कितीही कठीण आर्थिक परिस्थितीतही नुकसान सोसण्यास सक्षम असल्याचे आरबीआयच्या चाचणीत समोर आले आहे.
जीडीपी वाढीचा वेग सुसाट
भारतीय अर्थव्यवस्थेने विकासाच्या बाबतीत अनेक देशांना मागे टाकले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ ७.८% होती, जी दुसऱ्या तिमाहीत वाढून ८.२% वर पोहोचली आहे. खासगी उपभोग आणि सरकारी खर्च हे या वाढीचे मुख्य आधार ठरले आहेत. कमी झालेली महागाई, उत्तम मान्सून, कर कपात आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा विस्तार यामुळे पुढील काळातही हा विकासदर सकारात्मक राहील, असा विश्वास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
आव्हाने : रुपयावरील दबाव आणि जागतिक तणाव
आरबीआयने सकारात्मक चित्रासोबतच काही धोक्यांचीही सूचना दिली आहे. आयात शुल्कातील वाढ आणि भांडवल प्रवाहात झालेली घट यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया काहीसा कमकुवत झाला आहे. अमेरिकेतील शुल्कांचे बदललेले दर रुपयावर दबाव निर्माण करत आहेत. भू-राजकीय तणाव आणि जागतिक व्यापारामधील अनिश्चितता यामुळे काही प्रमाणात जोखीम कायम आहे.
वाचा - १३ दागिन्यांची दुकाने, ६ रेस्टॉरंट्स आणि ४ सुपरमार्केटचा मालक, तरीही दररोज चालवतात टॅक्सी; का?
आरबीआयचा अहवाल हे स्पष्ट करतो की भारतीय अर्थव्यवस्था एका मजबूत पायावर उभी आहे. जरी जागतिक तणावाचे ढग असले, तरी देशांतर्गत मागणी आणि बँकांची बळकट स्थिती भारताला भविष्यातील संकटांशी लढण्यासाठी सक्षम बनवत आहे.
