नवी दिल्ली : १ जानेवारीपासून रेफ्रिजरेटर (फ्रिज), टेलिव्हिजन (टीव्ही), एलपीजी गॅस शेगडी आणि कूलिंग टॉवर यांसारख्या घरगुती उपकरणांवर ऊर्जा कार्यक्षमतेचे 'स्टार रेटिंग' असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.
वाढती वीज टंचाई आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या 'ऊर्जा दक्षता ब्युरो'ने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या नवीन नियमांमुळे आता केवळ टीव्ही-फ्रिजच नव्हे, तर डीप फ्रीझर, वितरण ट्रान्सफॉर्मर आणि ग्रिडला जोडलेले सोलर इन्व्हर्टर यांवरही स्टार रेटिंग असणे बंधनकारक असेल.
जनतेच्या सूचनांचा विचार
या उपकरणांच्या स्टार रेटिंगसाठी जुलै २०२५ मध्ये नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. या सूचनांचा अभ्यास करूनच आता नवीन बदल लागू करण्यात येत आहेत.
नवे नियम काय?
रूम एअर कंडिशनर (एसी), इलेक्ट्रिक सीलिंग फॅन, वॉटर हिटर, वॉशिंग मशीन आणि एलईडी लॅम्पसाठीचे ऊर्जा कार्यक्षमतेचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.
ग्राहकांना काय फायदा?
कमी वीजबिल : स्टार रेटिंग असलेली उपकरणे खरेदी केल्यामुळे घराचे वीजबिल कमी होण्यास मदत होईल.
गुणवत्तेची खात्री : स्टार रेटिंगमुळे ग्राहकांना उपकरणाच्या कार्यक्षमतेची अधिकृत माहिती मिळेल, ज्यामुळे फसवणूक टळेल.
इंधन बचत : एलपीजी गॅस शेगडीवर स्टार रेटिंग आल्यामुळे गॅसचीही बचत होणार आहे.
काय होणार बदल?
बचतीचे गणित : उपकरणावर जितके जास्त 'स्टार्स' (१ ते ५), तितकी त्या उपकरणाची वीज किंवा इंधन वापरण्याची क्षमता कमी आणि बचत जास्त असेल.
स्टार रेटिंग कसे ओळखाल?
१ स्टार : सर्वात कमी कार्यक्षमता
(जास्त वीज वापर).
३ स्टार : मध्यम कार्यक्षमता आणि सरासरी बचत.
५ स्टार : सर्वाधिक कार्यक्षमता आणि मोठी आर्थिक बचत.
