नागपूर : 'सब कुछ ऑनलाइन'च्या युगात बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ई-चावडीवर एका क्लिकवर शॉपिंग करण्याकडे नागरिकांचा भर दिसून येत आहे. एकीकडे 'ई कॉमर्स' क्षेत्राचा विस्तार होत असताना दुसरीकडे त्यात सहभागी असलेल्या संकेतस्थळांविरोधातील तक्रारींचे प्रमाणदेखील वाढले आहे. या वर्षात या कंपन्यांविरोधात तक्रारींचा पाऊस पडला व अकरा महिन्यांतच ३.९७ लाखांहून अधिक जणांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनकडेच धाव घेतली.
ऑनलाइन संकेतस्थळे व अॅपच्या माध्यमातून खरेदीकडे लोकांचा कल असतो. त्यात गॅजेट्स, कपडे, पुस्तके आदींचा प्रामुख्याने समावेश असतो. नियमानुसार ग्राहकांनी ऑर्डर केलेलेच प्रॉडक्ट दावा केलेल्या ठराविक मुदतीत व योग्य स्थितीमध्ये पोहोचविणे अनिवार्य असते. मात्र, ई कॉमर्स कंपनीतील डिलिव्हरीबाबतच ग्राहकांच्या सर्वात जास्त तक्रारी असल्याचे समोर आले आहे.
ग्राहक मंत्रालयातर्फे ग्राहकांना तक्रारींसाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. टोल फ्री क्रमांक १९१५ द्वारे १७ भाषांमध्ये ग्राहकांना यात तक्रार नोंदवता येते. या हेल्पलाइनकडे जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ३ लाख ९७ हजार ३३३ तक्रारी करण्यात आल्या. यातील १ लाख ७८ हजार २३ (४४ टक्के) या डिलिव्हरीशी संदर्भात होत्या. चुकीचे प्रॉडक्ट डिलिव्हर केल्याच्या ५४ हजार ५६३ तर खराब प्रॉडक्ट डिलिव्हर केल्याच्या ५३ हजार २८५ तक्रारींचा समावेश होता.
पैसे घेऊनही डिलिव्हरीच नाही
अनेकदा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे घेतात. मात्र, पैसे घेऊनही त्यांना डिलिव्हरीच देण्यात येत नाही. अकरा महिन्यांत अशा पद्धतीच्या ४२ हजार ७८१ तक्रारी करण्यात आल्या तर ठराविक कालावधी उलटून गेल्यानंतरही डिलिव्हरी न दिल्याप्रकरणी २७ हजार ३९४ तक्रारी नोंदविण्यात आल्या.