नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, या नवीन दरांची अधिसूचना गुरुवारी रेल्वे मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ आजपासून म्हणजेच २६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
कुठे आणि किती झाली दरवाढ?
रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, प्रवासाच्या अंतरावर आधारित ही दरवाढ करण्यात आली आहे. २१५ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी साधारण वर्गाच्या अर्थात जनरल क्लासच्या भाड्यात प्रति किलोमीटर १ पैशाने वाढ करण्यात आली आहे. तर, मेल/एक्स्प्रेस गाड्यांमधील नॉन-एसी क्लास आणि सर्व गाड्यांच्या एसी क्लासच्या भाड्यात प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, जर तुम्ही ५०० किलोमीटरचा प्रवास करणार असाल, तर तुमच्या तिकीटात १० रुपयांची वाढ झालेली दिसेल.
कोणाला बसणार फटका?
या दरवाढीचा परिणाम राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस, हमसफर आणि अमृत भारत यांसारख्या सर्व प्रीमियम गाड्यांवर होणार आहे. याशिवाय अंत्योदय, गरीब रथ आणि जनशताब्दीच्या प्रवाशांनाही आता वाढीव भाडे मोजावे लागेल. २६ डिसेंबर किंवा त्यानंतर बुक होणाऱ्या सर्व तिकिटांना हे नवे दर लागू होतील. मात्र, ज्या प्रवाशांनी २६ डिसेंबरपूर्वीच आगाऊ आरक्षण केले आहे, त्यांना ही दरवाढ लागू होणार नाही.
या प्रवाशांना मोठा दिलासा
रेल्वेने एका बाजूला दरवाढ केली असली, तरी दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नोकरदार आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. उपनगरीय रेल्वे आणि 'सीझन तिकीट' धारकांसाठी भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला तूर्तास कोणतीही झळ बसणार नाही.
वर्षातील दुसरी दरवाढ
रेल्वेने चालू वर्षात दुसऱ्यांदा भाडेवाढ केली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात तिकीटांचे दर वाढवण्यात आले होते. आता सहा महिन्यांच्या आतच पुन्हा ही वाढ करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र, रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा आणि आधुनिक गाड्यांच्या संचलनासाठी ही वाढ आवश्यक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
किती झाली वाढ?
> २१५ किलोमीटरपर्यंत प्रवासासाठी कोणतेही वाढीव भाडे नसेल.
> २१६ ते ७५० किमी प्रवासासाठी साधारण ५ रुपये वाढतील.
> ७५१ ते १२५० किमी प्रवासासाठी १० रुपये वाढतील.
> १२५१ ते १७५० किमी प्रवासासाठी १५ रुपये वाढतील.
> तर २२५० किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी २० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
