सध्याच्या काळात नोकरी मिळवणे कठीण झाले असताना, देशातील नामांकित दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपनी अमूलने सर्वसामान्यांसाठी व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध करून दिली. चहाची टपरी उघडण्यासाठीही आता लाखो रुपये लागतात, मात्र अमुलची फ्रँचायझीसोबत तुम्ही अतिशय माफक गुंतवणुकीत स्वतःचा उद्योग सुरू करू शकता आणि दरमहा ४० हजार ते १.५ लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.
अमूलने आपल्या फ्रँचायझीसाठी दोन प्रकारचे मॉडेल दिले आहेत, जे तुमच्या जागेवर आणि गुंतवणुकीवर अवलंबून आहेत. अमूल प्रिफर्ड आउटलेट उघडण्यासाठी तुमच्याकडे १०० ते १५० स्क्वेअर फूट जागा असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला दोन लाख ते २.६ लाख रुपये गुंतवावी लागतील, ज्यात २५ हजार रुपये रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट, १ लाख रुपये नूतनीकरण आणि ७५ हजार रुपये उपकरणांवर खर्च यांचा समावेश आहे. अमृल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर सुरू करण्यासाठी तुम्हाला ६ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, ज्यात ५० हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आणि उर्वरित रक्कम दुकानाची सजावट व मशीनरीवर खर्च यांचा समावेश आहे.
कंपनीचा दरमहा १.५ लाखांपर्यंत कमाईचा दावा
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला अमूल कंपनीला कोणतीही रॉयल्टी किंवा नफ्यातील हिस्सा द्यावा लागत नाही. तुम्ही जितकी जास्त विक्री कराल, तितका नफा तुमचा असेल. योग्य ठिकाणी दुकान असल्यास महिन्याला १.५ लाखांपर्यंत सहज कमाई होऊ शकते, असा दावा अमूल कंपनीने केला आहे.
उत्पादनांनुसार मिळणारे कमिशन
अमुलच्या विविध उत्पादनांवर तुम्हाला आकर्षक कमिशन मिळते. दुधाच्या एका पाऊचवर २.५ टक्के कमिशन मिळते. तर, दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच पनीर, तूप आणि बटर यांसारख्या पदार्थांवर १० टक्के कमिशन दिले जाते. शिवाय, आईस्क्रीमवर २० टक्के आणि रेसिपी-आधारित वस्तूंवर ५० टक्क्यांवर्यंत कमिशन मिळते.
महत्त्वाची माहिती
अमूलची फ्रँचायझी मिळवण्यासाठी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे. इच्छुक उमेदवारांनी केवळ अमुलच्या अधिकृत वेबसाइट www.amul.com ला भेट देऊन अर्ज करावा. ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा. अमूल कधीही नोंदणीच्या नावाखाली आगाऊ पैसे मागत नाही. अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, दुकानाची कागदपत्रे किंवा भाडे करार आणि बँक तपशील आवश्यक असतात.
