Bank Loan : आतापर्यंत बँका कर्ज देण्यासाठी प्रामुख्याने तुमचा सिबिल स्कोअर, उत्पन्न आणि तारण काय ठेवणार याचा विचार करत असत. मात्र, भविष्यात, बँका तुमची आर्थिक ताकद आणि सामाजिक स्थिती देखील तपासू शकतात. बँका लवकरच कर्ज मंजुरी प्रक्रियेत आणखी एक प्रमुख रिअल-टाइम फिल्टर जोडण्याचा विचार करत असून, यात अर्जदाराचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जाणार आहे. तात्काळ कर्ज देण्यामुळे फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या वाढत आहे. यामुळे बँका सावध झाल्या आहेत.
मात्र गुन्हेगारी रेकॉर्ड तपासणे कर्ज नाकारण्याचा एकमेव आधार असू नये. अनेकांवर किरकोळ खटले असतात, मात्र ते पैसे परत करत असतात. जर बँकांनी प्रत्येक पोलिस रेकॉर्डला रेड सिग्नल म्हणून पाहिले तर अनेक प्रामाणिक लोकांना कर्ज नाकारले जाईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
बँकांना याची गरज का?
सध्या बँका कर्ज देण्यापूर्वी अर्जदारांची प्रतिष्ठा, आर्थिक स्थिती, वसुली रेकॉर्डचे मूल्यांकन करतात. कधीकधी ते ईडी व आर्थिक गुन्हे शाखा सारख्या एजन्सींच्या तपास अहवालांवर अवलंबून असतात, परंतु ही माहिती अनेकदा जुनी असते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा एखाद्या प्रमुख व्यावसायिकाला किंवा प्रवर्तकाला गुन्ह्यासाठी तुरुंगात टाकले जाते, तेव्हा त्यांचा व्यवसाय ठप्प होतो, ज्यामुळे कर्जाची परतफेड थांबते. गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा गैरवापर, गायब होणे किंवा फसवणूक करून चुकीचे सादरीकरण करणे या सामान्य तक्रारी आहेत. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे महत्त्वाचे झाले आहे.
