TV, Smartphone, Laptop Price Hike: जर तुम्ही स्मार्टफोन, टीव्ही किंवा लॅपटॉप घेण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या दोन महिन्यांत या उपकरणांच्या किमतीत ४ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. उद्योगातील जाणकार आणि बाजार तज्ज्ञांनी ही शक्यता वर्तवली आहे. स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना सध्या 'मेमरी चिप्स'च्या वाढत्या मागणीचा सामना करावा लागत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंगच्या वाढत्या वापरामुळे मेमरी चिप्सची मागणी प्रचंड वाढली असून त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
परिस्थिती इतकी गंभीर आहे की, यावर्षी प्रत्येक तिमाहीत किंवा दर महिन्याला किमती वाढण्याचा हा प्रकार सुरू राहू शकतो, असं उद्योगातील बड्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 'काउंटरपॉईंट रिसर्च' या मार्केट ट्रॅकिंग कंपनीच्या मते, मेमरी मार्केट आता 'हायपर-बुल' टप्प्यात आलंय. गेल्या तीन महिन्यांत किमतीत ५०% वाढ झाल्यानंतर, या तिमाहीत त्या आणखी ४०-५०% वाढतील. एप्रिल ते जून दरम्यान यात आणखी २०% वाढ होण्याची अपेक्षा आहे.
झटपट पटापट...! PNR ते ट्रेनचं लोकेशनसह सर्वकाही त्वरित मिळणार; रेल्वेचा जुगाड, फक्त करा एक SMS
मेमरी चिप्सचा पुरवठा विस्कळीत
काउंटरपॉईंट रिसर्चचे रिसर्च डायरेक्टर तरुण पाठक म्हणाले की, "व्हिवो आणि नथिंग सारख्या काही स्मार्टफोन कंपन्यांनी जानेवारीतच ३,००० ते ५,००० रुपयांपर्यंत किमती वाढवल्या आहेत. तर सॅमसंग सारख्या कंपन्या थेट किमती वाढवण्याऐवजी कॅशबॅक आणि डिस्काउंट कमी करत आहेत. मेमरीच्या किमती २०२६ आणि त्यापुढील वर्षीही वाढत राहतील. कंपन्या नवीन लाँचिंगमध्ये या वाढलेल्या किमतींचा समावेश करतील, पण खर्च नियंत्रित करण्यासाठी डिस्प्लेसारख्या काही घटकांची गुणवत्ता कमी करण्याची शक्यता आहे."
फोन उत्पादक कंपन्यांचं म्हणणं आहे की, मेमरी चिप्सचा पुरवठा मिळणं कठीण झालंय. कोडॅक, थॉमसन आणि ब्लूपंक ब्रँडचे टीव्ही विकणाऱ्या 'सुपर प्लास्ट्रोनिक्स' या कंपनीनं सांगितलं की, त्यांना मेमरी चिप्सच्या ऑर्डरचा फक्त दहावा हिस्साच मिळत आहे. "आम्ही नोव्हेंबरमध्ये ७% किमती वाढवल्या होत्या, आता या महिन्यात १०% वाढवत आहोत आणि फेब्रुवारीत आणखी ४% वाढवण्याची योजना आहे. प्रजासत्ताक दिन (Republic Day) सेलमध्ये सवलती खूपच कमी पाहायला मिळतील," कंपनीचे सीईओ अवनीत सिंह मारवाह म्हणाले.
किती वाढणार किंमत?
रिटेल चेनच्या मते, लॅपटॉपच्या किमती आधीच ५-८% वाढल्या आहेत आणि मोठ्या टीव्ही ब्रँड्सनीही लवकरच दरवाढीचे संकेत दिले आहेत. 'ग्रेट इस्टर्न रिटेल'चे संचालक पुलकित वैद्य म्हणाले की, "या दरवाढीचा थेट परिणाम मागणीवर होईल." 'ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन' (AIMRA) नुसार, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये स्मार्टफोनच्या किमती ३-२१% वाढल्या होत्या. येत्या काही महिन्यांत किमती ३०% पर्यंत वाढू शकतात.
"किमती वाढल्यामुळे बाजारात मोठी घसरण होण्याची भीती आहे. २०२६ मध्ये स्मार्टफोन शिपमेंट व्हॉल्यूममध्ये १०-१२% घट होऊ शकते. याचा सर्वाधिक फटका २०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सेगमेंटला बसेल, जो भारतात सर्वाधिक विकला जातो," असं AIMRA चे अध्यक्ष कैलास लखयानी म्हणाले. काउंटरपॉईंटच्या मते, मेमरी चिप्स आणि हँडसेटच्या किमती वाढल्यामुळे भारतात २०२६ मध्ये स्मार्टफोन विक्रीत २% घट दिसून येऊ शकते.
