नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक तेलाच्या किमतीत आलेल्या तेजीचा फटका भारतीय उद्योगांना बसणार आहे. उद्योग, टेलिकॉम टॉवर्स, व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या प्रीमियम किंवा उच्च-दर्जाच्या पेट्रोलच्या किमतीत शुक्रवारी प्रति लिटर २ रुपये तर औद्योगिक वापरासाठीच्या बल्क डिझेलच्या दरात सुमारे २२ रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांसाठी विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. आमचे प्राधान्य ग्राहकांना ऊर्जा उपलब्ध करून देणे आहे.
काय असतो या पेट्रोलमध्ये फरक?
सामान्य पेट्रोलमध्ये ९१-९२ ऑक्टेन रेटिंग असते जे दैनंदिन ड्रायव्हिंगसाठी पुरेसे कार्यक्षमतेचे असते. प्रीमियम पेट्रोलमध्ये ९५-९८ ऑक्टेन रेटिंग असते, ज्यामुळे ते उच्च-कार्यक्षमता किंवा उच्च-कंप्रेशन इंजिनसाठी अधिक योग्य ठरते.
याचा ग्राहकांवर काय परिणाम?
सर्वसामान्य ग्राहकांसाठी तात्काळ परिणाम दिसणार नाहीत. कारण सामान्य पेट्रोलच्या किमती त्याच ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, एक्सपी ९५ आणि पॉवर पेट्रोलसारख्या उच्च-ऑक्टेन इंधनाचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या इंधन खर्चात किरकोळ वाढ होईल. कच्च्या तेलाच्या किमती उच्च पातळीवर राहिल्यास, व्यापक इंधन दरवाढ नाकारता येणार नाही.
- दिल्लीमध्ये प्रीमियम ९५-ऑक्टेन पेट्रोलची किंमत ९९.८९ रुपयांवरुन १०१.८९ रुपये प्रति लिटर.
- दिल्लीमध्ये बल्क किंवा औद्योगिक डिझेलचे दर ८७.६७ रुपयांवरुन १०९.५९ रुपये प्रति लिटर.
- मुंबईत औद्योगिक डिझेलचे दर ९०.३९ रुपयांवरुन ११३.११ रुपये प्रति लिटर (२२.७२ रु. प्रति लिटर वाढ)
रुपयाचाही ‘अवकाळी’ नीचांक
परकीय गुंतवणूकदार सातत्याने पैसा काढून घेत असल्याने, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे रुपया शुक्रवारी ८२ पैशांनी, म्हणजेच जवळपास १ टक्क्यांनी घसरून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ९३.७१ या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला.
खरेदीमुळे बाजार सावरला
पीएसयू बँका, आयटी व मेटल शेअर्समधील जोरदार खरेदी आणि इंधन-आधारित महागाई वाढीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, सेन्सेक्स व निफ्टी शुक्रवारी दिवसभरातील बहुतांश वाढ गमावत अखेरीस सुमारे अर्धा टक्का वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स ३२५.७२ अंकांनी वाढून ७४,५३२.९६ वर बंद झाला. दिवसभरात तो १,०७९.१५ अंकांनी किंवा १.४५% वाढून ७५,२८६.३९ पर्यंत गेला. निफ्टी ११२.३५ अंकांनी वाढून २३,११४.५० वर बंद झाला.
