Ratan Tata Will News: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांची इच्छापत्रातील माहिती उघड झाली आहे. त्यांनी आपल्या संपत्तीतील मोठा भाग धर्मादाय संस्थांना दान केलाय. त्यांची संपत्ती अंदाजे ३,८०० कोटी रुपये आहे. यात टाटा सन्सचे शेअर्स आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. हे सर्व रतन टाटा एंडोमेंट फाऊंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टला देण्यात आल आहे. या दोन्ही कंपन्या धर्मादाय आणि लोकोपयोगी कामं करतात.
रतन टाटा यांच्याकडे इतरही काही मालमत्ता होत्या. यामध्ये बँकेत जमा झालेले पैसे, काही कागदपत्रे आणि घड्याळं आणि पेंटिंग्ज अशा गोष्टींचा समावेश होता. त्याची किंमत सुमारे ८०० कोटी रुपये होती. त्यातील एक तृतीयांश रक्कम त्यांनी शिरीन जेजेभॉय आणि दीना जेजेभॉय या दोन सावत्र बहिणींना दिली आहे. उर्वरित एक तृतीयांश रक्कम मोहिनी एम दत्ता यांच्याकडे गेली. मोहिनी टाटा समूहात काम करत होत्या आणि रतन टाटांच्या नजीकच्या होत्या.
आजपासून झाले ‘हे’ बदल, स्वस्त झाला सिलिंडर, महाग झाला टोल टॅक्स, काय बदललं? खिशावर होणार परिणाम
इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, रतन टाटा यांच्या जुहू बंगल्याचा काही भाग त्यांचे बंधू जिमी नवल टाटा यांना देण्यात येणार आहे. जिमी हे ८२ वर्षांचे आहेत. रतन टाटा यांनी अलिबागची मालमत्ता त्यांचे जवळचे मित्र मेहली मिस्त्री यांना दिली आहे. त्यांना तीन टाटांच्या तीन बंदुकाही मिळणार आहेत. इच्छापत्राची अंमलबजावणी करणाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयानं इच्छापत्र योग्य मानून स्वीकारावं, अशी त्यांची इच्छा आहे. इच्छापत्रातही काही बदल करण्यात आले आहेत, ज्यांना कोडिसिल म्हणतात. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार इच्छेनुसार मालमत्तेचे वाटप करता यावं यासाठी हा अर्ज करण्यात आला आहे.
दानधर्माला अधिक महत्त्व
रतन टाटा यांनी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी इच्छापत्र तयार केलं होतं. त्यात चार कोडिसिल (codicils) आहेत. कोडिसिल म्हणजे इच्छापत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर त्यात काही बदल करणं. रतन टाटा यांनी काही कंपन्यांचे शेअर्स खरेदी केल्याचं अखेरच्या कोडिसिलमध्ये नमूद करण्यात आलंय. यामध्ये लिस्टेड आणि अनलिस्टेड अशा दोन्ही कंपन्यांचा समावेश आहे. शिवाय काही मालमत्ता अशा होत्या ज्याबद्दल इच्छापत्रात काहीही लिहिलेलं नव्हतं. हे सर्व रतन टाटा एंडोमेंट फाऊंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टला समान दिलं जाईल.
इच्छापत्राची पूर्तता ही कायदेशीर प्रक्रिया आहे. यामध्ये इच्छापत्र खरं आहे की नाही, हे न्यायालय पाहतं. इच्छापत्र खरं आढळल्यास न्यायालय त्याची अंमलबजावणी करण्यास परवानगी देतं. त्यानंतर इच्छापत्राची अंमलबजावणी करणारी व्यक्ती इच्छापत्रानुसार मालमत्तेचं विभाजन करू शकते. वकील डेरियस खंबाटा, मेहली मिस्त्री, शिरीन आणि दीना जेजेभॉय यांनी इच्छापत्राची अंमलबजावणी केली आहे. न्यायालयानं योग्य मानलं तरच मालमत्तेचं विभाजन होईल. या प्रक्रियेस सुमारे सहा महिने लागू शकतात.
शंतनू नायडूंना काय मिळालं?
रतन टाटा यांचं गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी १२ लाख रुपयांचा निधी तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक जनावराला दर तीन महिन्यांनी ३० हजार रुपये दिले जातील. याशिवाय त्यांचे निकटवर्तीय शंतनू नायडू (Shantanu Naidu) यांना दिलेलं स्टुडेंट लोन माफ करण्यात येणार आहे. तसंच टाटांचे शेजारी जेक मॅलाईट यांना दिलेलं व्याजमुक्त शैक्षणिक कर्जही माफ करण्यात येणार आहे.
कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, रतन टाटा यांच्याकडे चार लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त रोकड होती. त्यांच्या बँक खात्यात आणि एफडीमध्ये सुमारे ३६७ कोटी रुपये होते. याशिवाय त्यांच्याकडे सुमारे ४० कोटी रुपयांची परकीय मालमत्ताही होती. यामध्ये सेशेल्समधील जमीन, वेल्स फार्गो बँक आणि मॉर्गन स्टॅनलीमधील खाती आणि अल्कोआ कॉर्प आणि होवेट एरोस्पेसमधील समभागांचा समावेश आहे. त्यांच्या मालमत्तेत ६५ घड्याळं आहेत. ही बल्गेरी, पाटेक फिलिप, टिसोट आणि ऑडेमर्स पिगुएट सारख्या ब्रँडची आहेत.
नोएल टाटांना काय मिळालं?
रतन टाटा यांनी सेशेल्समधील आपली जमीन आरएनटी असोसिएट्स सिंगापूरला दिली आहे. आरएनटी असोसिएट्स इंडिया आणि आरएनटी असोसिएट्स सिंगापूरमधील आर वेंकटरमण आणि पॅट्रिक मॅकगोल्डरिक यांचे शेअर्स सुरक्षित असावेत, असंही त्यांनी म्हटलंय. जिमी टाटा यांना चांदीची भांडी आणि काही दागिने मिळणार आहेत. जुहूच्या मालमत्तेचे ते अर्धे मालक असतील. ही मालमत्ता रतन टाटा यांना त्यांचे वडील नवल टाटा यांच्याकडून वारशानं मिळाली होती. उर्वरित अर्धा हिस्सा सिमोन टाटा आणि नोएल टाटा यांच्याकडे जाणार आहे.
अलिबागचा बंगला मेहली मिस्त्री यांना देताना टाटा यांनी आपल्या इच्छापत्रात लिहिलं होतं की, या प्रॉपर्टीच्या बांधकामात मिस्त्री यांनी खूप मदत केली होती. हा बंगला त्यांना एकत्र घालवलेल्या चांगल्या दिवसांची आठवण करून देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नो-कॉन्टेस्ट क्लॉज महत्त्वाचा
या इच्छापत्राचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा 'नो कॉन्टेस्ट क्लॉज'. रतन टाटांच्या इच्छापत्रात स्पष्टपणे म्हटलंय की, जर एखाद्या व्यक्तीनं या इच्छापत्राला कोणत्याही प्रकारे आव्हान दिलं तर तो इच्छापत्रात दिलेली सर्व मालमत्ता आणि अधिकार गमावेल. 'जो कोणी माझ्या या शेवटच्या इच्छेला आव्हान देईल त्याचा माझ्या मालमत्तेवर कोणताही अधिकार राहणार नाही आणि त्याला माझ्याकडून कोणताही वारसा मिळणार नाही,' असंही त्यात नमूद करण्यात आलंय.