लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशभरात सण-उत्सवांच्या काळात प्रवासात वाढ झाल्याने ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलची विक्री पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. मात्र, या काळात डिझेलची मागणी स्थिर राहिली आहे. हे नेहमी दिसणाऱ्या प्रवाहाच्या उलट कल आहे, असे आकडेवारीतून समोर आले आहे.
ऑक्टोबरमध्ये पेट्रोलचा खप सात टक्क्यांनी वाढून ३६.५ लाख टनांवर गेला आहे. सप्टेंबरमध्ये ही विक्री ३४ लाख टन होती. सणांच्या काळात प्रवास, पर्यटन आणि वाहन वापर वाढल्याने पेट्रोलची मागणी वाढली आहे. देशात सर्वाधिक वापरले जाणारे इंधन म्हणजे डिझेल. मात्र, ऐतिहासिकदृष्ट्या, जूनमध्ये पावसामुळे डिझेलचा वापर कमी होतो. कारण सिंचन पंप चालवण्यासाठी इंधनाची मागणी कमी होते आणि वाहनांच्या वाहतुकीवरही परिणाम होतो.
ऑक्टोबरमधील इंधन विक्री
इंधन प्रकार - विक्री(लाख टन) - मागील वर्षाच्या तुलनेत बदल
- पेट्रोल ३६.५ ७%
 - डिझेल ७६ -०.५%
 - विमान इंधन ०.७६९ १.६%
 - स्वयंपाक गॅस ३० ५.४%
 
एप्रिलपासून झालेली इंधन विक्री
इंधन प्रकार एकूण विक्री(कोटी टन) वाढ (%)
- पेट्रोल २.४८ ६.८%
 - डिझेल ५.३३ २.४५%
 - विमान इंधन ०.५२ १%
 - स्वयंपाक गॅस १.९७ ७.२%
 
आर्थिक वर्षातील एकूण वाढ
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या सात महिन्यांत पेट्रोल, डिझेल, विमान इंधन आणि एलपीजी या सर्वच इंधनांच्या मागणीत वाढ झाली आहे.
पावसाळा संपल्यानंतर डिझेल विक्री वाढते, मग घटली का?
ऑक्टोबरपासून पाऊस कमी झाल्याने तसेच सणासुदीच्या हंगामामुळे विक्री वाढते. सध्या ऑक्टोबरमध्ये डिझेलची विक्री ७६ लाख टनांवर राहिली, गेल्या वर्षी याच महिन्यात ती ७६.४ लाख टन होती. पावसाळा संपल्यानंतर डिझेलची मागणी साधारणपणे वाढते. परंतु, यंदा थोडीशी घट दिसून आली आहे.
स्वयंपाक गॅसचा वापर वाढला
विमान वाहतूक वाढल्याने विमान इंधन विक्री १.६ टक्क्यांनी वाढून ७.६९ लाख टनांवर गेली आहे.  स्वयंपाकासाठी वापरला जाणारा एलपीजी (गॅस) विक्रीही ५.४ टक्क्यांनी वाढून जवळपास ३० लाख टनांवर गेला आहे. या वाढीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत (पीएमयूवाय) २५ लाख नवीन घरांची भर पडली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या १०.३३ कोटींवरून १०.५८ कोटींवर 
पोहोचली आहे.
