Petrol Diesel Rates Today: पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी चढ-उतार होत असतानाही, देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या स्थिर आहेत. आज कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या खाली आले आहेत. ब्रेंट क्रूड ९८.३१ डॉलर आणि WTI ८७.६५ डॉलर प्रति बॅरलवर होते.
पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय आहेत?
इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवलेले नाहीत. आज २५ मार्च रोजी सकाळी ६ वाजता जारी केलेल्या दरांनुसार, दिल्लीत इंडियन ऑईलच्या पंपांवर साध्या पेट्रोलची किरकोळ किंमत ९४.७७ रुपये आणि डिझेल ८७.६७ रुपये प्रति लिटर आहे. तर, XP95 पेट्रोल १०१.८९ रुपये आणि XG डिझेल ९१.४९ रुपये प्रति लिटर आहे. सिमल्यात साधं पेट्रोल ९५.०५ रुपये आणि डिझेल ८७.१३ रुपये प्रति लिटर आहे. येथील XP95 पेट्रोलची किंमत १०३.६६ रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर १०३,५० रुपयांवर आणि डिझेलचे दर ९०.०३ रुपये प्रति लिटर इतकेच आहेत.
शेअर बाजारात तेजी परतली, सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला; निफ्टी २३,२०० च्या वर उघडला
भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल कोठे मिळतं?
भारतात सर्वात स्वस्त तेल पोर्ट ब्लेअरमध्ये असून तिथे पेट्रोल ८२.४६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ७८.०५ रुपये प्रति लिटर आहे. इतर शहरांचा विचार केल्यास, सिलवासा (दादरा आणि नगर हवेली) मध्ये पेट्रोल ९२.३७ रुपये प्रति लिटर आहे. उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये पेट्रोल ९२.७८ रुपये तर रुद्रपूरमध्ये ९२.९४ रुपये प्रति लिटर आहे. ईटानगरमध्ये पेट्रोल ९०.८७ रुपये तर डिझेल ८०.३८ रुपये प्रति लिटर आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत जबरदस्त चढ-उतार
युद्धामुळे हॉर्मुज सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) होणारा तेल पुरवठा प्रभावित झाला आहे. यामुळे ब्रेंट क्रूडची किंमत फेब्रुवारीच्या शेवटी सुमारे ७० डॉलरवरून वाढून १०८ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली होती. मात्र, तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्यानंतर ती १०० डॉलरच्या खाली घसरून ९८ डॉलरच्या आसपास पोहोचली आहे. अशा प्रकारे जागतिक बाजारपेठेत मोठी अस्थिरता दिसून येत आहे.
कसे ठरतात पेट्रोल-डिझेलचे दर?
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींची असते, कारण हेच मुख्य कच्चं साहित्य आहे. याव्यतिरिक्त, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर रुपया कमकुवत झाला, तर तेल आयात महाग होते आणि पर्यायानं देशांतर्गत किमतींवर दबाव वाढतो.
