नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या नवीन बचत खात्यांसाठी बँकेने किमान शिल्लक रक्कम ठेवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता मेट्रो आणि शहरी भागातील ग्राहकांना खात्यात ५०,००० रुपये ठेवणे बंधनकारक असेल, अन्यथा दंड भरावा लागेल. यापूर्वी ही मर्यादा फक्त १०,००० रुपये होती, त्यात आता तब्बल पाच पट वाढ करण्यात आली आहे.
या सर्व शुल्कांवर आणि दंडावर नेहमीप्रमाणे जीएसटी लागू होईल. विशेष म्हणजे, एका बाजूला अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दंड माफ केला आहे, तर दुसऱ्या बाजूला आयसीआयसीआय बँकेने मात्र दंड अधिक कठोर केला आहे.
नवीन नियम
आयसीआयसीआय बँकेने केवळ शहरी भागासाठीच नव्हे, तर निम-शहरी आणि ग्रामीण भागांसाठीही किमान शिल्लक मर्यादा वाढवली आहे.
या ग्राहकांना दिलासा
काही विशिष्ट प्रकारच्या खातेधारकांना या नियमांमधून सूट देण्यात आली आहे. हे खातेधारक किमान शिल्लक रक्कम न ठेवताही त्यांचे व्यवहार सुरू ठेवू शकतात.
सॅलरी अकाउंट : पगार जमा होणाऱ्या खात्यांना सूट.
प्रधानमंत्री जन-धन योजना खाते : शून्य शिल्लक असणाऱ्या या खात्यांसाठी कोणताही दंड नाही.
नियम मोडल्यास भुर्दंड?
खातेदाराने मासिक सरासरी शिल्लक रक्कम ठेवली नाही, तर त्याला दंडात्मक शुल्क भरावे लागेल. हा दंड ५० हजार रुपये पूर्ण होण्यासाठी जितकी रक्कम कमी असेल त्या रकमेच्या ६% किंवा ५०० रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तितका असेल.
शहरी भागासाठी ५०,००० रु.
अर्ध-शहरी भागासाठी २५,००० रु.
ग्रामीण भागासाठी १०,००० रु.