Advanced Income Tax: या तिमाहीसाठी ॲडव्हान्स टॅक्स (Advance Tax) भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे. ज्या व्यक्तींचे उत्पन्न पगाराव्यतिरिक्त इतर स्रोतांतून आहे, जसं की भांडवली नफा, व्याज, लाभांश किंवा व्यावसायिक उत्पन्न, अशा उत्पन्नावर त्यांना वर्षाच्या शेवटी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची वाट न पाहता, वर्षभरातच कर भरावा लागतो. ॲडव्हान्स टॅक्स हे सुनिश्चित करतो की, सरकारला कराची रक्कम वेळेवर मिळावी आणि व्यक्ती मोठी रक्कम एकाच वेळी भरण्याच्या किंवा व्याजाच्या दंडातून वाचू शकेल.
कधी भरणे आवश्यक आहे?
जर टीडीएस (TDS) आणि टीसीएस (TCS) वजा केल्यानंतर, बिगर-पगार उत्पन्नावरील एकूण कर दायित्व (Tax Liability) १०,००० रुपयांपेक्षा अधिक असेल, तर ही रक्कम वर्षभरात चार हप्त्यांमध्ये भरणे अनिवार्य आहे. हे दायित्व उत्पन्नाच्या स्रोतानुसार वेगवेगळ्या प्रकारे गणले जाते.
मोठ्या तेजीनंतर आज सोन्या-चांदीचे दर घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची किंमत
अंदाज लावणं कधी आवश्यक?
जर तुम्हाला व्यवसाय किंवा अन्य ठिकाणाहून उत्पन्न मिळत असेल, तर तुम्हाला आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अंदाजित करपात्र उत्पन्नाचे आकलन करावं लागतं आणि त्यानुसार ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो.
तर, भांडवली नफा (Capital Gain) आणि लाभांश उत्पन्नाच्या (Dividend Income) बाबतीत, जोपर्यंत हे उत्पन्न प्रत्यक्षात प्राप्त होत नाही, तोपर्यंत ॲडव्हान्स टॅक्स देण्याची गरज नसते. या उत्पन्नावर कर त्याच तिमाहीत द्यावा लागतो.
ॲडव्हान्स टॅक्सच्या हप्त्यांची अंतिम मुदत
पहिला हप्ता: १५ जूनपर्यंत, अंदाजित कर दायित्वाच्या १५%.
दुसरा हप्ता: १५ सप्टेंबरपर्यंत, अंदाजित कर दायित्वाच्या ४५%.
तिसरा हप्ता: १५ डिसेंबरपर्यंत, अंदाजित कर दायित्वाच्या ७५%.
चौथा हप्ता: १५ मार्चपर्यंत, अंदाजित कर दायित्वाच्या १००%.
ज्येष्ठ नागरिकांनाही ॲडव्हान्स टॅक्स द्यावा लागेल का?
६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्या ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न व्यवसाय किंवा अन्य ठिकाणाहून नाही, त्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरण्यापासून सूट आहे. तथापि, जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाचे उत्पन्न व्यवसाय किंवा अन्य ठिकाणाहून असेल, तर त्यांना देखील ॲडव्हान्स टॅक्सचे नियम लागू होतील.
हप्ता चुकवल्यास दंड काय लागेल?
जर ॲडव्हान्स टॅक्सचा कोणताही हप्ता वेळेवर जमा केला गेला नाही, तर त्या चुकलेल्या हप्त्यावर व्यक्तीला ३% व्याज द्यावं लागते. उदाहरणार्थ, समजा एकूण १ लाख रुपयांच्या ॲडव्हान्स टॅक्सपैकी १५ जूनपर्यंत तुम्हाला १५,००० रुपये जमा करायचे होते. जर तुम्ही ते केले नाही, तर कर विभाग थकीत रकमेवर तीन महिन्यांसाठी प्रति महिना १% दराने व्याज लावेल, जे एकूण ३% होते. या स्थितीत, तुम्हाला वेळेवर जमा न केलेल्या १५,००० रुपयांवर ४५० रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. तुम्ही नंतर ती रक्कम जमा केली तरी, चुकलेल्या हप्त्यासाठी हे तीन महिन्यांचे व्याज लागू राहील.
