मुंबई : फेब्रुवारी २०२५ पासून रेपो दरात एकूण १.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली असून, या कपातीचा थेट लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बँकांना केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तसेच काही खासगी बँकांच्या प्रमुखांची बैठक संजय मल्होत्रा यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२५ पासून रेपो दरात एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो दर आता ५.२५ टक्के झाला आहे. या कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळायला हवा.
मल्होत्रा यांनी सांगितले की, व्याज दर कपात आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर यामुळे बँकांची खर्चात बचत होऊ शकते. बँकांनी ग्राहक सेवा सुधारावी, तक्रारी कमी कराव्यात.
फेर-केवायसी आणि दावा न केलेल्या ठेवींवर बँकांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. रिझर्व्ह बँकेसोबत बँकांच्या प्रमुखांची याआधीची अशी बैठक २७ जानेवारी रोजी झाली होती.
