oyo parent company : जागतिक ट्रव्हल टेक प्लॅटफॉर्म ओयो (OYO) त्यांच्या मूळ कंपनीचे नाव बदलण्याच्या तयारीत आहे. यासाठी ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यांनी त्यांच्या मूळ कंपनी 'ओरवेल स्टेज' (Oravel Stays) साठी नवीन नावाच्या सूचना मागवल्या आहेत. ओयो आपला बहुप्रतिक्षित आयपीओ (IPO) लाँच करण्याची तयारी करत असताना, कंपनीकडून हे एक धोरणात्मक पाऊल मानले जात आहे.
नवीन नावासाठी ३ लाखांचे बक्षीस आणि रितेश अग्रवालला भेटण्याची संधी!
मिळालेल्या माहितीनुसार, या सुचविलेल्या नावांपैकी निवडले जाणारे नाव ओयो भविष्यात लाँच करणार असलेल्या प्रीमियम हॉटेल ॲपचे नाव असण्याची दाट शक्यता आहे. या स्पर्धेत विजेत्याला ३ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल आणि त्याला रितेश अग्रवाल यांना भेटण्याची संधी देखील मिळेल. अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (विशेषतः एक्स - पूर्वीचे ट्विटर) "नवीन ओळख" निर्माण करण्यासाठी नावांच्या सूचना मागवल्या आहेत.
रितेश अग्रवाल यांनी पोस्टमध्ये काय लिहिले?
रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आम्ही या सगळ्यामागील कॉर्पोरेट ब्रँडचे नाव बदलत आहोत. हॉटेल चेन नाही, ग्राहकोपयोगी उत्पादन नाही – तर शहरी नवोपक्रम आणि आधुनिक जीवनशैलीच्या जागतिक परिसंस्थेला बळ देणारी मूळ कंपनी." ते पुढे म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की जगाला एका नवीन प्रकारच्या जागतिक ब्रँडला भेटण्याची वेळ आली आहे. भारतात जन्मलेला, परंतु जगासाठी बनवलेला."
अग्रवाल यांनी अपेक्षित असलेल्या नवीन नावासाठी काही निकष सांगितले आहेत.
- ते एक धाडसी, एका शब्दात बोलणारे कॉर्पोरेट नाव असले पाहिजे.
- त्याची भावना जागतिक असावी, कोणत्याही एका संस्कृती किंवा भाषेशी जोडलेली नसावी.
- तंत्रज्ञानात अग्रणी, भेदक, पण मानवी आणि संस्मरणीय असावे.
- आदरातिथ्याच्या पलीकडे जाण्यासाठी पुरेसे व्यापक असावे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यावर '.com' डोमेन उपलब्ध असले पाहिजे.
- आयपीओ आणि नवीन प्रीमियम ॲपची तयारी!
ओयो आता आयपीओ आणण्याच्या तयारीला लागलं आहे. जूनमध्ये त्यांच्या प्रमुख शेअरहोल्डर सॉफ्टबँकच्या (SoftBank) लंडन कार्यालयात एक महत्त्वाचे सादरीकरण होणार आहे, जे कंपनीच्या सार्वजनिक सूचीकरणाचा (Public Listing) मार्ग निश्चित करू शकते. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आयपीओ लाँच करण्याची ओयोची योजना आहे.
वाचा - अर्शद वारसी अडचणीत! 'पंप अँड डंप' प्रकरणात सेबीची मोठी कारवाई, पत्नीचाही सहभाग उघड
याव्यतिरिक्त, ओयो त्यांच्या प्रीमियम हॉटेल्स आणि मिड-मार्केट ते प्रीमियम कॉर्पोरेट-सर्व्हिसेस्ड हॉटेल्ससाठी एक स्वतंत्र ॲप लाँच करण्याचा सक्रियपणे विचार करत आहे. कारण, या सेगमेंटमध्ये भारतात तसेच जागतिक बाजारपेठेत वेगाने वाढ झाली आहे. ओयोचा हा बदल केवळ कंपनीच्या विकासासाठीच नव्हे, तर भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या जागतिक आकांक्षांसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो.