Indian Economy: भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि अमेरिकेचा निकटवर्तीय देश असलेल्या ब्रिटननंदेखील भारताचं श्रेष्ठत्व मान्य केलं आहे. ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी गुरुवारी सांगितलं की, भारत २०२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे आणि ब्रिटन या प्रवासात भागीदार बनण्यासाठी योग्य स्थितीत आहे. भारत-ब्रिटन व्यापार करार ब्रिटनला तंत्रज्ञान, लाईफ सायन्सेस, रिन्युएबल एनर्जी आणि इतर क्षेत्रांमध्ये आपले नेतृत्व वाढवण्याची संधी देईल, असं मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना स्टार्मर म्हणाले.
दोन्ही देश ‘ब्रिटन-भारत तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम’ देखील अधिक मजबूत करत असल्याचं स्टार्मर म्हणाले. बुधवारी उच्च-स्तरीय शिष्टमंडळासह मुंबईत पोहोचलेल्या स्टार्मर यांनी सांगितलं की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशिया-युक्रेन संघर्षावरही चर्चा केली आणि दोन्ही देशांनी हा संघर्ष संपवण्यासाठी सामायिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. दोन्ही देशांनी २०३० पर्यंत एकमेकांमधील व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे, जो सध्या ५६ अब्ज डॉलर्स इतका आहे.
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
भारत विरुद्ध जर्मनी
भारत सध्या अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. असं मानलं जात आहे की, पुढील काही वर्षांत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. फोर्ब्सच्या मते, सध्या जर्मनीची अर्थव्यवस्था ४.७४ ट्रिलियन डॉलर्स आहे, तर भारताची अर्थव्यवस्था ४.१९ ट्रिलियन डॉलर आहे. या वर्षी जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत ०.१ टक्के घट होण्याची शक्यता आहे, तर भारतीय अर्थव्यवस्था ६.२ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.