OLA 10 Minute Delivery: गेल्या काही काळापासून इंस्टट डिलिव्हरीची भारतात लोकप्रियता वाढली आहे. यामध्ये Zepto, Blinkit, Flipkart या प्रमुख कंपन्या आहेत. आता लवकरच यात आणखी एका कंपनीची भर पडणार आहे. कॅब सर्व्हिस देणारी कंपनी Ola, आता घरोघरी फक्त 10 मिनिटांत किराणा/दैनंदिन सामानाची(Grocery Home Delivery) होम डिलिव्हरी करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे.
OLA ने सुरू केली ग्रॉसरी सेवा
भाविश अग्रवाल (Bhavish Agarwal) यांनी त्यांच्या कंपनी ओला कॅब्स ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) प्लॅटफॉर्मद्वारे क्विक डिलिव्हरी मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. ओला कॅब्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा आता देशभरात सुरू झाली असून, ग्राहक फक्त 10 मिनिटांत आवश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी मिळूवू शकतात.
Everyday essentials and groceries at your doorstep in just 10 minutes. Ola Grocery is now live across India!
— Ola (@Olacabs) December 23, 2024
Order Now on the Ola app and enjoy:
🛒 Up to 30% Off
🛍️ Free Delivery
⚡ Instant & Scheduled Delivery pic.twitter.com/wJqjqWSiSt
30% सवलत आणि मोफत होम डिलिव्हरी
ओलाने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या ओला डिलिव्हरी सर्व्हिसचा वापर करून किराणा ऑर्डर केल्यास 30 टक्क्यांपर्यंत सूट मिळते, शिवाय फ्री होम डिलिव्हरी सेवाही देण्यात येत आहे. याशिवाय ग्राहकांना त्यांची ऑर्डर शेड्यूल करण्याचा पर्यायदेखील असेल.
स्विगी, झेप्टो अन् फ्लिपकार्टशी स्पर्धा
ओलासारख्या मोठ्या कंपनीने या क्विक डिलिव्हरी मार्केटमध्ये एंट्री घेतल्यामुळे स्पर्धा आणखी वाढली आहे. झेप्टो, ब्लिंकिट, फ्लिपकार्टसह अनेक लहान-मोठ्या कंपन्या देशात क्विक डिलिव्हरी सर्व्हिस देत आहेत. यामध्ये फ्लिपकार्ट सर्वात नवीन असून, आता ओलानेदेखील प्रवेश केला आहे.
भारताचे क्विक डिलिव्हरी मार्केट
भारतामध्ये क्विक कॉमर्स मार्केट खूप वाढले आहे. कोरोनाच्या काळात ई-कॉमर्स आणि 10 मिनिट होम डिलिव्हरी सेवा लोकप्रिय झाल्या. मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार, सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, ब्लिंकिटचा या मार्केटमध्ये सर्वाधिक 46 टक्के हिस्सा आहे, त्यानंतर झेप्टो 29 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर स्विगी इन्स्टामार्टचा बाजार वेगाने वाढत आहे. रिपोर्ट्सनुसार, जागतिक ई-कॉमर्स कंपनी Amazon देखील भारतात Tez नावाची स्वतःची सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे.