PAN Aadhaar Linking Last Date: पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. मात्र, अद्यापही अनेक लोकांनी हे काम पूर्ण केलेलं नाही. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल, तर आगामी वर्षात तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. आयकर विभागाच्या नियमानुसार, १ जुलै २०१७ किंवा त्यापूर्वी जारी केलेल्या सर्व पॅन कार्डसाठी आधार लिंकिंग अनिवार्य करण्यात आलं आहे. नवीन पॅन कार्डची पडताळणी आधीच आधारद्वारे केली जात असल्यानं, नवीन पॅन धारकांना ही प्रक्रिया स्वतंत्रपणे करण्याची आवश्यकता नाही.
पॅन-आधार लिंकचे स्टेटस कसे तपासावं?
अनेक लोकांना आपले पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही, याची माहिती नसते. अशा व्यक्ती ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन आपले स्टेटस तपासू शकतात. यासाठी तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवरील 'लिंक आधार स्टेटस' या पर्यायावर जावं लागेल. या पोर्टलवर तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर टाकताच स्टेटस स्क्रीनवर दिसेल. जर स्टेटसमध्ये 'N' असं दिसत असेल, तर याचा अर्थ तुमचं पॅन आधारशी लिंक नाही आणि तुम्हाला ते लवकरात लवकर लिंक करून घेणं आवश्यक आहे.
सोन्या-चांदीच्या किंमतीतबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
पॅन-आधार लिंक न केल्यास काय होईल?
जर तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅन-आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर येणाऱ्या वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून गुंतवणूक, बँकिंग व्यवहार, आयकर परतावा (ITR) आणि इतर आर्थिक कामांमध्ये तुमच्या अडचणी वाढू शकतात. आयकर विभागानं आधीच स्पष्ट केलंय की, लिंकिंगच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही. याचाच अर्थ, दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
आयकर विभागाचा करदात्यांना इशारा
आयकर विभागाने करदात्यांना आवाहन केलंय की, अंतिम तारखेची वाट पाहण्यापेक्षा ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. वेळेत लिंक न केल्यास महत्त्वाच्या सेवांमध्ये अडथळा निर्माण होण्यासोबतच तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतं आणि तुम्हाला दंडाचाही भुर्दंड सोसावा लागू शकतो. त्यामुळे, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करणं हिताचं ठरेल.
