केंद्र सरकारनं शुक्रवारी एक नवीन पोर्टल लॉन्च केलं. या पोर्टलमुळे ई-लिलावाद्वारे मालमत्तांची विक्री करण्यास मदत होणार आहे. या मालमत्तांमध्ये व्यावसायिक मालमत्ता, औद्योगिक भूखंड, दुकानं, वाहनं तसंच शेती व बिगरशेती जमिनींचा समावेश आहे. 'बँकनेट' (BAANKNET) असं या पोर्टलचं नाव आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09
सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांकडून ई-लिलाव झालेल्या मालमत्तांची माहिती एकत्र केली जाते. खरेदीदार आणि गुंतवणूकदार या पोर्टलवर विविध मालमत्ता पाहू शकतात. अनेकदा अशा प्रॉपर्टी स्वस्तात मिळतात. परंतु, लोकांना त्यांची माहिती मिळत नाही. म्हणजेच या पोर्टलमुळे स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
कसं काम करतं बँकनेट?
वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांनी शुक्रवारी व्यावसायिक मालमत्ता, औद्योगिक जमीन, दुकानं, वाहनं, कृषी आणि बिगरशेती जमिनींच्या ई-लिलावासाठी नवीन पोर्टल सुरू केलं. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 'बँकनेट' नावाचं हे पोर्टल सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ई-लिलाव केलेल्या मालमत्तांची माहिती एकत्र करेल. हे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना मालमत्तांच्या विस्तृत श्रेणीचा शोध घेण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.
काय काय खरेदी करता येणार?
बँकनेटवर लिस्ट होणाऱ्या मालमत्तांमध्ये फ्लॅट, घरं आणि मोकळे भूखंड, व्यावसायिक मालमत्ता, औद्योगिक जमीन आणि इमारती, दुकानं, वाहनं, कमर्शिअल प्रॉपर्टी, मशिनरी, कृषी आणि बिगरशेती जमीन यांचा समावेश आहे.
लिलावात सहभागी होणं सोपं
या सर्व मिळकतींचा तपशील एकाच ठिकाणी एकत्रित करून या पोर्टलमुळे मालमत्तांच्या ई-लिलावात माहिती गोळा करणं आणि त्यात सहभागी होणं सोपं होणार आहे. यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना संधी ओळखणं सोपं जाईल. या प्लॅटफॉर्ममुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची थकबाकी वसूल होण्यास मोठी मदत होईल. यामुळे बँकांच्या ताळेबंदातही सुधारणा होणार आहे. व्यवसाय आणि व्यक्तींसाठी कर्जाची उपलब्धता वाढेल, असं नागराजू यावेळी म्हणाले.