न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेने भारतावर २५ टक्के समतुल्य आयात शुल्क (रिसिप्रोकल टॅरिफ) लावण्याची घोषणा केली असून त्यासोबतच अन्य सुमारे ७० देशांवर लादल्या जाणाऱ्या शुल्काची यादीही जाहीर केली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘समतुल्य आयात शुल्कात आणखी सुधारणा’ या नावाचा कार्यकारी आदेश गुरुवारी रात्री जारी केला आहे. तथापि, आयातीच्या प्रक्रियेतील वस्तूंना यातून ७ दिवसांची सूट देण्यात आली असून यामुळे १ ऑगस्टऐवजी ७ ऑगस्टपासून अमेरिकेचे नवीन आयात शुल्क लागू होणार आहे.
ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशात म्हटले की, काही व्यापार भागीदारांनी अमेरिकेसोबत अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा याबाबतीत महत्त्वपूर्ण व्यापार व सुरक्षा करारांवर सहमती दर्शवली आहे किंवा सहमती देण्याच्या टप्प्यावर आहेत.
काही व्यापार भागीदार मात्र वाटाघाटींत जाचक अटी घालत आहेत. अमेरिकेचा त्यांच्यासोबतच्या व्यापारातील असमतोल या अटींमुळे दूर होणार नाही, असे मला वाटते. काही व्यापार भागीदारांनी अमेरिकेसोबत वाटाघाटी करण्यातही रस दाखवला नाही. अशा भागिदारांवर टॅरिफ लादले जात आहेत.
अनेक देशांची व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी धावपळ, मेक्सिकोच्या टॅरिफवर ९० दिवसांची स्थगिती
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचे वाढीव टॅरिफ लागू होण्यापूर्वीच अमेरिकेसोबतच्या व्यापार करारास अंतिम स्वरूप देण्यासाठी जगभरातील देश धावपळ करीत असल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबाम यांनी वाढीव टॅरिफला ९० दिवसांची स्थगिती मिळविण्यात यश मिळविले आहे.
अमेरिकेसोबत करार नसलेल्या देशांना लागणार टॅरिफ
अमेरिकेसोबत व्यापार करार नसलेल्या सुमारे डझनभर देशांवर ट्रम्प प्रशासनाकडून ७ ऑगस्टनंतर वाढीव टॅरिफ लावले जाण्याची शक्यता आहे.
ट्रम्पकडून कॅनडाच्या वस्तूंवर ३५ टक्के टॅरिफ
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून येणाऱ्या वस्तूंवरील आयात कर २५ टक्क्यांवरून ३५ टक्के केला आहे. कॅनडाने अमली पदार्थ तस्करांविरोधात पुरेशा कारवाया न केल्याचा आरोप त्यांनी केला. कॅनडाने पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता दिल्यामुळेही व्यापार करार कठीण होईल, असे ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान मार्क कार्नी यांनी यावर नाराजी व्यक्त करत निर्यात विविध करण्याचा इशारा दिला. लाकूड, स्टील, ॲल्युमिनियम आणि वाहन उद्योगांवर परिणाम होणार आहे. काही वस्तूंना USMCA करारामुळे संरक्षण मिळणार आहे, पण इतरांवर ४०% कर लागू होणार आहे.
टॅरिफ घोषणेनंतर रुपया सावरला, पण...
अमेरिकेच्या टॅरिफ घोषणेनंतर शुक्रवारी रुपया डॉलरच्या तुलनेत १२ पैशांनी वधारून ८७.५३ रुपयांवर बंद झाला. त्याआधी गुरुवारी रुपया ८७.६५ वर बंद झाला होता, ही आतापर्यंतची मोठी घसरण होती. अमेरिका व भारत यांच्यातील व्यापार तणावामुळे डॉलर मजबूत राहिला. पण, आरबीआयकडून हस्तक्षेप, तसेच कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण यामुळे रुपया काही प्रमाणात सावरला.
अस्थिरतेची शक्यता!
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह तब्बल ७० देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंवर लावलेल्या टॅरिफला 'अमेरिकन प्रोटेक्शनिझम' म्हणजेच संरक्षणवादी व्यापारधोरणाच्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक व्यापारात अस्थिरता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत-अमेरिका व्यापार कराराचे भवितव्यही धोक्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स संघटनेवरही टीका
ट्रम्प यांनी ब्रिक्स गटालाही लक्ष करत भारत, रशिया, चीन यांची एकत्रितपणे "अमेरिकाविरोधी" भूमिका असल्याचा आरोप केला आणि त्या "मरणासन्न अर्थव्यवस्था" असल्याचा आरोपही केला.
व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता : या नव्या धोरणामुळे व्यापारी व आयातदार यांच्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
कोणावर किती टॅरिफ?
ब्रिटन १०%
जपान १५%
पाकिस्तान १९%
श्रीलंका २०%
लाओस ४०%
म्यानमार ४०%
शेअर बाजारात मोठी घसरण
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स ५८५.६७ अंकांनी (०.७२%) घसरून ८०,५९९.९१ वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी २०३ अंकांनी (०.८२%) घसरून २४,५६५.३५ वर बंद झाला.
पीएमआय निर्देशांकात वाढ : जुलैमध्ये भारताच्या उत्पादन क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक ५९.१ नोंदवण्यात आला असून हा मार्च २०२४ नंतरचा उच्चांक आहे. मागणी व उत्पादनात वाढ झाल्याने ही स्थिती निर्माण झाली.