UPI Transactions : भारतासह जगभरात 'युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस' अर्थात यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भाजीवाल्यापासून ते ऑनलाइन खरेदीपर्यंत, बहुतेक लोक आता UPI द्वारे पेमेंट करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एक बातमी जोरदार व्हायरल होत होती की, २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर कर लागणार आहे. यामुळे डिजिटल व्यवहार करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कर्नाटकमध्ये तर दुकानदारांनी स्कॅनर काढून टाकत असल्याचेही व्हिडीओ समोर आले आहेत.
यावर आता सरकारने स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे! अर्थ मंत्रालयाने ही बातमी पूर्णपणे 'खोटी' आणि 'निराधार' असल्याचे म्हटले आहे. सरकारने सांगितले आहे की, UPI द्वारे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि कर लावण्याची कोणतीही योजना नाही.
संसदेत सरकारने दिले स्पष्टीकरण
फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्यसभा खासदार अनिल कुमार यादव यांनी सभागृहात सरकारला प्रश्न विचारला होता की, '२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याचा विचार आहे का?' तसेच, अशा कोणत्याही योजनेला विरोध करणारे जनतेचे कोणतेही प्रतिनिधित्व सरकारला मिळाले आहे का, असेही त्यांनी विचारले होते.
या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की, जीएसटीशी संबंधित निर्णय केवळ जीएसटी परिषदेच्या शिफारशींच्या आधारे घेतले जातात. आणि आतापर्यंत परिषदेकडून अशी कोणतीही शिफारस आलेली नाही. महसूल विभागानेही म्हटले आहे की, जीएसटी परिषद ही एक संवैधानिक संस्था आहे. या परिषदेच्या शिफारशींवरच कर दर आणि सवलती निश्चित केल्या जातात. त्यामुळे, परिषद कोणतीही शिफारस करत नाही तोपर्यंत कोणताही नवीन कर लागू करता येणार नाही.
सध्या कोणताही GST लागू नाही
सध्या, कोणत्याही प्रकारच्या UPI व्यवहारावर मग तो व्यक्ती ते व्यक्ती असो किंवा व्यक्ती ते व्यापारी सो GST लागू नाही, व्यवहाराची रक्कम कितीही असली तरी. UPI ला त्याच्या जलद, सुलभ आणि अनेकदा कॅशबॅक सारख्या वैशिष्ट्यांमुळे लोकांमध्ये खूप पसंती मिळाली आहे.
वाचा - तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
UPI म्हणजे काय?
UPI (Unified Payments Interface) ही एक 'रिअल टाइम पेमेंट सिस्टम' आहे. डिजिटल पेमेंटसाठी UPI सारखी सुविधा तुम्हाला घरबसल्या सहजपणे पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. यासाठी तुम्हाला पेटीएम, फोनपे, भीम, गुगलपे इत्यादी UPI सपोर्ट करणारे ॲप्स आवश्यक आहेत. विशेष म्हणजे, स्कॅनर, मोबाईल नंबर किंवा UPI आयडी यापैकी फक्त एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. यामुळे बँक तपशील देण्याची गरज भासत नाही, तुमचे काम फक्त एका UPI आयडीने होते, ज्यामुळे व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित होतात. त्यामुळे, आता निश्चिंतपणे आपले UPI व्यवहार सुरू ठेवा!