कर्मचारी भविष्य निर्वाहनिधीत जमा असलेले पैसे अडचणीच्या काळात काढणे सहज आणि सोपे व्हावे यासाठी संघटनेने नियमांमध्ये अनेक मोठे बदल केलेे आहेत. आता ऑनलाइन पीएफ काढताना तुम्हाला रद्द केलेला (कॅन्सल) चेक अपलोड करावा लागणार नाही. यासाठी कंपनी किंवा नियोक्त्याची मंजुरी घ्यावी लागणार नाही. हे सोपस्कर पूर्ण करताही कर्मचाऱ्यांना पीएफ काढण्याचा अर्ज भरता येईल.
पासबुकचा फोटोही अपलोड करण्याचीही गरज नाही. बँक खात्याच्या व्हेरिफिकेशनसाठी आता कंपनीच्या मंजुरीची गरज नाही. जर तुम्हाला बँक खाते बदलायचे असेल, तर तुम्ही आधार ओटीपीच्या मदतीने स्वतःच नवीन खाते जोडू शकता. हा बदल सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे आणि आता पैसे काढण्यात उशीर होणार नाही. पूर्वी पीएफ काढण्यासाठी खूप वेळ लागायचा. यासाठी अर्ज करणे हे ही खूप कटकटीचे होते. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी ३ दिवसांचा वेळ लागत असे. यासाठी तुम्ही जिथे काम करीत होतात त्या कंपनीची मंजुरी घेण्यासाठी १३ ते १५ दिवसांचा वेळ जात असे.
आता या अटी काढून टाकल्याने पैसे काढणे सुलभ झाले आहे. ईपीएफओमध्ये सध्या सुमारे ७.७४ कोटी सदस्य आहेत. सुमारे १५ लाख कर्मचाऱ्यांचे दावे केवळ नियोक्त्याच्या मंजुरीमुळे अडकले होते, आता त्यांना थेट फायदा होईल.