नवी दिल्ली: भारतात नव्या पिढीला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, त्यांच्याकडे त्याच्या कल्पनाही आहेत, पण त्यासाठीचा मार्गदर्शकच नाही! देशभरातील ३५ ते ३६ टक्के विद्यार्थ्यांनी स्पष्ट सांगितलंय की, मेंटॉरशिपचा अभाव हीच आमची सर्वात मोठी अडचण आहे.
बीएमएल मुंजाल विद्यापीठाच्या लीडरशिप समिटमध्ये सादर झालेल्या 'यूथ आंत्रप्पुनरशिप अँड स्टार्टअप गव्हर्नन्स' या अहवालातून हा निष्कर्ष (संस्थापक, गुंतवणूकदार, सीएक्सओ) समोर आला आहे. या अभ्यासात १,००० विद्यार्थी आणि २०० उद्योगतज्ज्ञ सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांकडे कल्पना आणि उत्साह आहे, पण योग्य हात धरायला कोणी नाही. त्यामुळे अनेक स्वप्नं कॉलेजच्या चार भिंतीतच थांबतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
'थंड' बस्त्यात जातात कल्पना
विद्यार्थ्यांनी मान्य केलं आहे की त्यांचं विद्यापीठ उद्योजकतेला साथ देते, पण इन्क्युबेशन सिस्टिम कमजोर आहे. केवळ ९.६% विद्यार्थी म्हणाले की, इन्क्युबेशन सेंटर 'अत्यंत प्रभावी' आहे. म्हणजे कॉलेजमध्ये कल्पना तयार होते, पण ती अंमलात येईपर्यंत ती 'थंड' पडते.
आता काय करावे? विद्यापीठांनी आता उद्योजकतेसाठी 'मार्गदर्शन ते गुंतवणूक' अशी साखळी तयार केली, तर पुढचा यशस्वी उद्योजक वर्गातूनच जन्म घेईल.
७५% विद्यार्थ्यांनी भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
टॅलेंट आहे, टूल्स नाहीत हा अहवाल सांगतो की, भारतात तरुणाई उत्साही आहे, पण 'सिस्टम' तयार नाही. त्यांच्याकडे कल्पना आहेत पण त्यांना आकार देण्यासाठी मेंटॉर, नेटवर्क आणि स्ट्रक्चर नाही. म्हणजेच देशाकडे "टॅलेंट आहे, पण टूल्स नाहीत."
