टाटा समूहाच्या परंपरेला आणि प्रशासनाला हादरवून टाकणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीव्हीएस मोटरचे 'चेअरमन एमिरिटस' आणि टाटा ट्र्स्टचे उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी 'बाई हिराबाई जे. टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन'च्या ट्रस्टी पदाचा राजीनामा दिला आहे. माजी ट्रस्टी मेहली मिस्त्री यांनी श्रीनिवासन यांच्या पात्रतेवर कायदेशीर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर काही तासांतच हा निर्णय घेण्यात आला आहे.
नेमका वाद काय?
मेहली मिस्त्री यांनी महाराष्ट्र राज्याच्या चॅरिटी कमिशनरकडे एक धाव घेतली असून, वेणू श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे. मिस्त्री यांच्या दाव्यानुसार ट्रस्टच्या १९२३ मधील मूळ नियमावलीनुसार, सर्व ट्रस्टी हे 'पार्शी झोरोस्ट्रियन' धर्माचे असणे अनिवार्य आहे. तसेच मुंबईचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
अपात्रतेचा दावा
श्रीनिवासन आणि सिंह हे या दोन्ही अटी पूर्ण करत नसल्यामुळे ते ट्रस्टी पदावर राहण्यास अपात्र आहेत, असा दावा मिस्त्री यांनी केला आहे.
वेणू श्रीनिवासन यांचे स्पष्टीकरण
राजीनामा देताना वेणू श्रीनिवासन यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक व्यस्ततेचे कारण दिले आहे. मात्र, कायदेशीर पेच निर्माण झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, श्रीनिवासन हे टाटा समूहाच्या इतर सात प्रमुख ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
टाटा ट्रस्टची भूमिका
टाटा ट्रस्टने मेहली मिस्त्री यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रस्टच्या अंतर्गत माहितीनुसार, धर्माची अट ही ट्रस्टी होण्यासाठी कायदेशीर अडथळा नाही, असा कायदेशीर सल्ला त्यांनी घेतला आहे. मात्र, नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखालील या ट्रस्टमध्ये आता अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे.
काय आहे हा 'एलाइड ट्रस्ट'?
सोप्या भाषेत सांगायचं तर, 'टाटा ट्रस्ट्स' ही एक मुख्य संस्था आहे, ज्याच्या अंतर्गत अनेक स्वतंत्र ट्रस्ट काम करतात. 'बाई हीराबाई ट्रस्ट' (BHJTNCI) हा सर रतन टाटा ट्रस्टशी जोडलेला एक सहयोगी म्हणजेच 'एलाइड ट्रस्ट' आहे. या ट्रस्टची स्थापना १९२३ मध्ये करण्यात आली होती. हा ट्रस्ट १९२३ पासून नवसारी (गुजरात) येथे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पारसी समुदायाची सेवा करत आहे.
