केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठा बदल करत 'फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज'साठी ग्रॅच्युइटी मिळवण्याची पात्रता कमी केली आहे. आता निश्चित मुदतीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५ वर्षांऐवजी फक्त १ वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतरही ग्रॅच्युइटीचा लाभ घेता येणार आहे.
सरकारने लागू केलेल्या नवीन कामगार संहिता सुधारणांचा हा एक भाग आहे. या निर्णयामुळे 'फिक्स्ड टर्म' करारावर काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत, ग्रॅच्युइटीचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याला एकाच संस्थेत सलग ५ वर्षे सेवा पूर्ण करणे अनिवार्य होते. मात्र, नवीन नियमांनुसार, 'फिक्स्ड टर्म' कर्मचाऱ्यांसाठी ही ५ वर्षांची कालमर्यादा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
पात्रता फक्त १ वर्ष
'फिक्स्ड टर्म' करारावर काम करणाऱ्या व्यक्तीला आता केवळ १ वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावरही ग्रॅच्युइटी मिळेल. नवीन नियमांनुसार, 'फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज'ना स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व फायदे मिळतील, ज्यात सुट्ट्या, वैद्यकीय सुविधा आणि सामाजिक सुरक्षा यांचा समावेश आहे. 'फिक्स्ड टर्म' कर्मचाऱ्याला स्थायी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने वेतन देणे अनिवार्य असेल.
सरकारचा उद्देश कंत्राटी पद्धतीने होणारे काम कमी करून, थेट नोकर भरतीला प्रोत्साहन देणे आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण वाढवणे हा आहे.
ग्रॅच्युइटी म्हणजे काय?
ग्रॅच्युइटी ही कर्मचाऱ्याने कंपनीला दिलेल्या योगदानाच्या बदल्यात कंपनीकडून मिळणारी एक प्रकारची 'भेट' असते, जी आर्थिकदृष्ट्या मोठा आधार ठरते. याचा फायदा आता कमी सेवा कालावधीतही 'फिक्स्ड टर्म' कर्मचाऱ्याला मिळणार आहे.
