Online UPI Payment: डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही Google Pay, PhonePe किंवा Paytm सारखे ॲप्स वापरत असाल, तर आता तुम्हाला तुमचे सर्व व्यवहार पाहण्यासाठी वेगवेगळ्या ॲप्समध्ये लॉगिन करण्याची गरज पडणार नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) एक नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे युजर्स एकाच ॲपमधून त्यांचे सर्व UPI व्यवहार आणि ऑटो पेमेंट्स पाहू आणि व्यवस्थापित करू शकतील. हा बदल ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व UPI ॲप्स आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्ससाठी अनिवार्य असेल. म्हणजेच, नवीन वर्षापूर्वी ही प्रणाली देशभरातील सर्व डिजिटल पेमेंट युजर्ससाठी लागू होईल. यामुळे केवळ डिजिटल पेमेंट्समध्ये पारदर्शकता वाढेल असं नाही, तर युजर्सचं आर्थिक नियोजन आणि ऑटो पेमेंट ट्रॅकिंग देखील खूप सोपं होईल.
नवीन बदल काय?
आतापर्यंत, जर एखाद्या युजरच ऑटो पेमेंट्स Google Pay वर अॅक्टिव्ह असतील आणि PhonePe वरही काही व्यवहार सुरू असतील, तर त्यांना प्रत्येक ॲपवर जाऊन ते वेगवेगळे पाहावे लागत होते. पण, नवीन प्रणालीमध्ये युजर कोणत्याही एका ॲपवर जाऊन सर्व UPI ॲप्सचे ऑटो पेमेंट्स आणि मॅंडेट्स एकाच ठिकाणी पाहू शकतील.
मॅंडेट पोर्ट करण्याची सुविधा
आता युजर्सना हवं असल्यास, ते त्यांचे UPI मॅंडेट्स एका ॲपमधून दुसऱ्या ॲपमध्ये ट्रान्सफर (पोर्ट) करू शकतील. म्हणजे, जर तुम्ही Netflix किंवा विजेच्या बिलाचे ऑटो पेमेंट Google Pay वरून सेट केले असेल, तर आता तुम्ही ते PhonePe किंवा Paytm वर घेऊन जाऊ शकता, तेही काही क्लिकमध्ये. यामुळे ॲप बदलणे पूर्वीपेक्षा सोपं होईल आणि युजर आपल्या आवडीचा प्लॅटफॉर्म निवडू शकेल.
पेमेंट्स आणखी सुरक्षित होतील
NPCI नं सांगितले की, नवीन अपडेट अंतर्गत फेस आयडी आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन यांसारखी फीचर्स देखील जोडली जातील, ज्यामुळे UPI व्यवहार आणखी सुरक्षित होतील.
काय फायदा होईल?
या बदलानंतर, डिजिटल पेमेंट युजर्स त्यांच्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवू शकतील. त्याचबरोबर, ऑटो पेमेंट्स ट्रॅक करणं आणि रद्द करणं देखील सोपं होईल.