Cyber Crime : सायबर गुन्हेगारांनी सरकारच्या नाकी नऊ आणले आहेत. कॉलर ट्यूनला सूचना दिल्यानंतरही गुन्ह्यांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. हे गुन्हेगार रोज नवनवीन क्लुप्त्या वापरुन लोकांची आर्थिक फसवणूक करत आहे. आता सायबर भामट्यांच्या रडारवर शहरात शिकणाऱ्या गरीब विद्यार्थी आले आहेत. हे गुन्हेगार गरजू विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांना पैशाचे आमिष देत त्यांचे बँक खाते भाड्याने घेत आहेत. या खात्यांचा वापर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करण्यासाठी केला जात आहेत. यांची पद्धत अशी आहे, की कोणताही गरीब विद्यार्थी यात लगेच अडकू शकतो.
कशी होते विद्यार्थ्यांची फसवणूक?
मागील काही दिवसांपासून अशा घटना समोर येत आहेत, ज्यात सायबर गुन्हेगार आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधत आहेत. आपण व्यावसायिक असून कर वाचवण्यासाठी आम्ही काही व्यवहार तुमच्या बँक खात्यातून करू इच्छितो. यासाठी तुम्हाला महिन्याला १० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले जाते. विद्यार्थ्यांना पैशाची गरज असल्याने या ऑफरला ते भाळतात. विश्वास बसावा म्हणून गुन्हेगार लगेच १०,००० रुपये बँक खात्यात ट्रान्सफर करतात. या खात्याचा वापर हे गुन्हेगार सायबर गुन्ह्यातील पैसे फिरवण्यासाठी करतात. अशा प्रकरणात क्रिमिनल लांब राहतात पण विद्यार्थी अडकत आहेत.
पालकांनी सावध राहण्याची आवश्यकता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सायबर गुन्हेगार या भाड्याच्या खात्यांचा वापर विविध प्रकारचे ऑनलाइन फ्रॉड करण्यासाठी करत आहेत. यामध्ये बनावट पेमेंट करणे, चोरी केलेले पैसे ट्रान्सफर करणे किंवा इतर बेकायदेशीर मार्गाने मिळवलेली रक्कम फिरवणे इत्यादींचा समावेश आहे. यामुळे प्रत्यक्ष गुन्हेगार तर कायद्याच्या कचाट्यातून वाचतात, पण ज्या विद्यार्थ्यांच्या खात्याचा वापर केला जातो, ते मात्र गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकण्याची शक्यता असते. अशा प्रकरणात आपली मुलं अडकू नये यासाठी पालकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. याबद्दल मुलांना जागृत करण्याचे आवाहन सायबर
या संदर्भात बोलताना सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले की, "अनोळखी व्यक्तींच्या बँक खात्याच्या मागणीला बळी पडणे अत्यंत धोकादायक आहे. विद्यार्थ्यांना तात्पुरता आर्थिक फायदा दिसत असला तरी, भविष्यात त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यांचे बँक खाते गोठवले जाऊ शकते, त्यांच्यावर गुन्हेगारी आरोप दाखल होऊ शकतात आणि त्यांचे संपूर्ण भविष्य धोक्यात येऊ शकते."
वाचा - टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
पोलिसांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, "जर कोणी तुम्हाला तुमचे बँक खाते भाड्याने घेण्याची ऑफर देत असेल, तर त्वरित पोलिसांना त्याची माहिती द्या. आपली बँक खाती आणि वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करू नका."