जगभरात पुन्हा एकदा 'टॅरिफ वॉर' सुरू झाल्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेने यापूर्वीच अनेक देशांवर टॅरिफ वाढवून दबाव आणला असताना, आता त्यांचे अनुकरणकरतमेक्सिकोनेही एक मोठा निर्णय घेतला आहे. मेक्सिकोने चीन, भारत, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इंडोनेशियासह अनेक आशियाई देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर तब्बल ५०% पर्यंत हाय टॅरिफ लादण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
२०२६ पासून ५०% टॅरिफ लागू, कोणावर परिणाम?
मेक्सिकोच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम चीन आणि भारतासह दक्षिण कोरिया, थायलंड आणि इंडोनेशियावर होणार आहे.
कोणत्या वस्तू महागणार?
पुढील वर्षी २०२६ पासून, मेक्सिको या देशांमधून येणाऱ्या ऑटो पार्ट्स, कापड, स्टील आणि इतर वस्तूंवर ५०% पर्यंत टॅरिफ आकारणार आहे. सिनेटमध्ये मंजूर झालेल्या या विधेयकानुसार, अनेक वस्तूंवरील टॅरिफ ३५% पर्यंत वाढवले जाणार आहे.
मेक्सिकोने का उचलले 'हे' पाऊल?
स्थानिक उद्योगांना संरक्षण देणे हे या टॅरिफ वाढीचे वरवरचे कारण असले तरी, या निर्णयामागे वेगळी आर्थिक आणि राजकीय गणिते असल्याची चर्चा आहे. अमेरिकेप्रमाणेच मेक्सिको आपल्या स्थानिक उत्पादन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. विश्लेषकांच्या मते, मेक्सिकोचा हा निर्णय प्रत्यक्षात अमेरिकेला खूश करण्यासाठी घेतला जात आहे.
तर, मेक्सिको आपली वित्तीय तूट भरून काढण्यासाठी देखील प्रयत्नशील आहे. या शुल्क वाढीतून पुढील वर्षी ३.७६ अब्ज डॉलर्स अतिरिक्त महसूल मिळवण्याचे मेक्सिकोचे उद्दिष्ट आहे.
१,४०० वस्तूंवर लागणार टॅरिफ
मेक्सिकन सिनेटने मंजूर केलेल्या या सुधारित विधेयकात अंदाजे १,४०० आयात केलेल्या वस्तूंवर कर लादले जातील. पूर्वीच्या प्रस्तावापेक्षा ही आवृत्ती थोडी सौम्य करण्यात आली असली तरी, अनेक वस्तूंवर ५०% पर्यंतचा टॅरिफ लागू होणार असल्याने आशियाई निर्यातदार देशांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या हाय टॅरिफमुळे मेक्सिकोशी कोणताही मुक्त व्यापार करार नसलेल्या भारतासारख्या देशांच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
