Netflix-Warner Bros Acquisition: नेटफ्लिक्सने वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीचे अधिग्रहण केल्याची माहिती समोर आली आहे. नेटफ्लिक्सनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याची घोषणा केली, ज्यात म्हटले आहे की दोन्ही कंपन्या मिळून पुढील शंभर वर्षांच्या स्टोरीटेलिंगला नवी दिशा देतील. या निर्णयामुळे ओटीटी, टीव्ही आणि चित्रपट उद्योगात एक नवं पर्व सुरू झालंय.
७२ अब्ज डॉलर्सचा मेगा करार
नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीचा चित्रपट आणि टीव्ही युनिट तसेच स्ट्रीमिंग डिव्हिजन सुमारे ७२ अब्ज डॉलर्सना (₹ ६.४७ लाख कोटी) विकत घेतला. या कराराचा अर्थ असा आहे की, गेम ऑफ थ्रोन्स, हॅरी पॉटर, डीसी कॉमिक्स यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या आणि महागड्या कंटेंट फ्रँचायझीचं थेट नियंत्रण आता नेटफ्लिक्सकडे असेल. यामुळे नेटफ्लिक्सला डिस्ने आणि पॅरामाउंट सारख्या मोठ्या प्रतिस्पर्धकांवर मोठी आघाडी मिळेल.
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
कधीपासून सुरू होता हा करार?
हा करार अचानक झालेला नाही. पॅरामाउंट, कॉमकास्ट आणि नेटफ्लिक्स या तिन्ही कंपन्यांमध्ये अनेक आठवडे जोरदार स्पर्धा सुरू होती. नेटफ्लिक्सनं प्रति शेअर सुमारे २८ डॉलर्सची ऑफर देऊन इतर सर्व बोली लावणाऱ्यांना मागे टाकले. पॅरामाउंटकडून या प्रक्रियेवर प्रश्नही उपस्थित करण्यात आले, परंतु अखेरीस नेटफ्लिक्सने बाजी मारली.
बाजाराची प्रतिक्रिया
या कराराची अधिकृत घोषणा होताच बाजाराचा मूड थोडा मिश्र दिसून आला. नेटफ्लिक्सचे शेअर्स सुमारे ३% नी घसरले, तर वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी २४.५ डॉलर्सच्या पातळीवर स्थिर राहिले. पॅरामाउंटच्या शेअर्समध्येही सुमारे २.२% ची घसरण दिसून आली. एकूणच, गुंतवणूकदार या मेगा विलीनीकरणाबाबत थोडे सावध दिसत आहेत आणि बाजारही हीच अनिश्चितता दर्शवत आहे.
नेटफ्लिक्स आधीच जगातील सर्वात मोठी स्ट्रीमिंग सेवा आहे आणि वॉर्नर ब्रदर्सकडेही एचबीओ मॅक्स सारख्या प्लॅटफॉर्मसह सुमारे १३० मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. त्यामुळे या कराराची अमेरिका आणि युरोपमध्ये कठोर अँटिट्रस्ट तपासणी होणे निश्चित मानलं जात आहे. विश्लेषकांचं मत आहे की ही तपासणी दीर्घकाळ चालू शकते, परंतु नेटफ्लिक्स या पावलाद्वारे भविष्यातील कंटेंट राइट्स पूर्णपणे सुरक्षित करू इच्छितो.
भागधारकांना काय मिळणार?
या करारामध्ये वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या प्रत्येक भागधारकाला २३.२५ डॉलर्स रोख आणि सोबत ४.५० डॉलर्स किमतीचे नेटफ्लिक्सचे शेअर्स मिळणार आहेत. यानुसार कंपनीचं एकूण मूल्य सुमारे ७२ अब्ज डॉलर्स बनतं, जे कर्ज जोडल्यानंतर सुमारे ८२.७ अब्ज पर्यंत पोहोचतं.
तीन वर्षांनंतर मोठ्या बचतीचा नेटफ्लिक्सचा दावा
नेटफ्लिक्सचा दावा आहे की, या मेगा विलीनीकरणानंतर तीन वर्षांनी कंपनी दरवर्षी सुमारे २–३ अब्ज डॉलर्सची खर्चात बचत करेल. म्हणजेच, दीर्घकाळात हा करार केवळ कंटेंटची शक्ती वाढवणारा नाही, तर खर्च कमी करून नेटफ्लिक्सची कमाईही मजबूत करेल.
