Amul Dairy Products GST 2.0: अमूल ब्रँड अंतर्गत डेअरी प्रोडक्टचं मार्केटिंग करणाऱ्या GCMMF (गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ) नं शनिवारी तूप, बटर, आईस्क्रीम, बेकरी आणि फ्रोझन स्नॅक्ससह ७०० हून अधिक उत्पादनांच्या किरकोळ किमती कमी करण्याची घोषणा केली. जीएसटी दर कपातीचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी कंपनीनं उत्पादनांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन किमती २२ सप्टेंबर म्हणजेच आजपासून लागू होतील. GCMMF नं यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. ग्राहकांना GST कपातीचा पूर्ण फायदा मिळावा यासाठी ७०० हून अधिक उत्पादनांच्या किमतीच्या यादीत सुधारणा करण्यात आली आहे आणि ही नवे दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील, असं त्यांनी नमूद केलंय.
कोणत्या वस्तूंवर किती बचत होईल?
गुजरात सहकारी दूध विपणन महासंघानं दिलेल्या माहितीनुसार, "हे बदल बटर, तूप, यूएचटी दूध, आईस्क्रीम, चीज, चॉकलेट, बेकरी रेंज, फ्रोझन डेअरी आणि बटाट्याचे स्नॅक्स, कंडेन्स्ड मिल्क, पीनट स्प्रेड, माल्ट-आधारित पेये इत्यादी उत्पादन श्रेणींमध्ये केले गेले आहेत." बटरची (१०० ग्रॅम) एमआरपी ६२ रुपयांवरून ५८ रुपये करण्यात आली आहे.
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
तूपाची किंमत ४० रुपयांनी कमी करून ६१० रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. अमूल प्रोसेस्ड चीज ब्लॉकची (१ किलो) कमाल किरकोळ किंमत ३० रुपयांनी कमी करून ५४५ रुपये प्रति किलो करण्यात आली आहे. फ्रोझन पनीरची (२०० ग्रॅम) नवीन कमाल किरकोळ किंमत २२ सप्टेंबरपासून लागू होऊन सध्याच्या ९९ रुपयांवरून ९५ रुपये करण्यात आलीये.
खप वाढण्याचा विश्वास
"अमूलचा असा विश्वास आहे की किमती कमी केल्यानं विविध दुग्धजन्य पदार्थांचा, विशेषतः आइस्क्रीम, चीज आणि बटरचा वापर वाढेल, कारण भारतात प्रति व्यक्ती वापर अजूनही खूपच कमी आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढीच्या संधी निर्माण होतील," असं अमूलनं निवेदनाद्वारे सांगितलं. किमती कमी केल्याने त्यांच्या दुग्धजन्य उत्पादनांची मागणी वाढेल आणि त्यांचा व्यवसाय वाढेल, असंही त्यांनी म्हटलं. अमूलच्या आधी मदर डेअरीनेही २२ सप्टेंबरपासून त्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली होती.