सरकारनं आशीष पांडे यांची युनियन बँक ऑफ इंडियाचे (Union Bank of India) व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. तर, कल्याण कुमार यांची सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं या नियुक्त्यांना तीन वर्षांच्या प्रारंभिक कालावधीसाठी मंजुरी दिली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे सध्याचे कार्यकारी संचालक असलेले पांडे, कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. तर पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) कार्यकारी संचालक असलेले कल्याण कुमार हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि सीईओ म्हणून एम. व्ही. राव यांचं स्थान घेतील. राव जुलैमध्ये सेवानिवृत्त होत आहेत.
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
३० मे रोजी, वित्तीय सेवा संस्था ब्युरोनं (FSIB) पांडे आणि कुमार यांची अनुक्रमे युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती.
एफएसआयबीचे प्रमुख, तसंच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे माजी सचिव भानु प्रताप शर्मा आहेत. पूर्वीच्या ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि एमडी अनिमेष चौहान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी कार्यकारी संचालक दीपक सिंघल आणि पूर्वीच्या आयएनजी वैश्य बँकचे माजी एमडी शैलेंद्र भंडारी हे या ब्युरोचे इतर सदस्य आहेत.